India-Uzbekistan Relations: भारत-उझबेकिस्तान संबंध आणखी दृढ होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च पुरस्कार राष्ट्रपती शवकत मिर्झीयोयेव यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला. यावेळी पंतप्रधान म्हणाले, “मी हा सर्वोच्च सन्मान अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो आणि तो आपल्या दोन देशांमधील शतकानुशतके चालत आलेल्या मैत्रीला आणि सामायिक वारशाला समर्पित करतो. तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि मैत्रीने आमचे संबंध सातत्याने अधिक दृढ केले आहेत.”
रविवारी पंतप्रधान मोदींना वैयक्तिकरित्या हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंतप्रधान पुढे म्हणाले की, “मी हा सर्वोच्च सन्मान अत्यंत विनम्रतेने स्वीकारतो आणि तो आपल्या दोन देशांमधील शतकानुशतके चालत आलेल्या मैत्रीला आणि सामायिक वारशाला समर्पित करतो. तुमच्या दूरदर्शी नेतृत्वाने आणि भारताप्रती असलेल्या तुमच्या मैत्रीने आमचे संबंध सातत्याने अधिक दृढ केले आहेत. हे संबंध नव्या उंचीवर पोहोचत आहेत आणि परिणामी, आज आमचे संबंध ‘व्यापक सामरिक भागीदारी’च्या नव्या स्तरावर पोहोचले आहेत.”
पंतप्रधान मोदी म्हणाले की, या पुरस्कारामुळे अभिमान आणि सन्मान वाटतो, पण मला याचीही जाणीव आहे की यासोबत एक मोठी जबाबदारीही येते. ते म्हणाले, “उझबेकिस्तानच्या या ऐतिहासिक भूमीवरून, मी उझबेकिस्तानच्या लोकांना आश्वासन देऊ इच्छितो की, भारत आपल्या जबाबदाऱ्यांपासून कधीही दूर पळणार नाही आणि ही मैत्री कायम ठेवेल.”
ताश्कंदहून पंतप्रधान मोदींचा संदेश
राष्ट्रपती मिर्झीयोयेव यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, “मी तुमचे पुस्तक पाहिले, ज्यात तुम्ही सर्व प्रमुख क्षेत्रांमधील प्रकल्पांची ओळख करून दिली आहे आणि आपले द्विपक्षीय आर्थिक सहकार्य पुढे नेण्यासाठी एक कालमर्यादा निश्चित केली आहे. मी या उपक्रमाचे कौतुक करतो. मला विश्वास आहे की आपण एकत्र मिळून यावर वेगाने प्रगती करू.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, काल रात्री भोजनावेळी आमची अर्थपूर्ण चर्चा झाली आणि अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बाबींवर आमचे संघदेखील एकमताने आहेत. परस्पर सहकार्याच्या सर्व पैलूंना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही परराष्ट्र मंत्री स्तरावर एक समन्वय परिषद स्थापन करू. आम्ही आमच्या संयुक्त आयोगाला सचिव स्तरावरून मंत्री स्तरावर उन्नत करू. दोन्ही बाजू संयुक्तपणे एक व्यावसायिक शिखर परिषद आयोजित करतील, ज्यात दोन्ही देशांतील व्यावसायिक नेत्यांचा समावेश असेल.
युरेनियम पुरवठ्यावरही चर्चा झाली
“आम्ही युरेनियम पुरवठ्यासाठी दीर्घकालीन व्यवस्था प्रस्थापित करू. आज, आम्ही तीन भगिनी-शहर आणि भगिनी-राज्य संबंध प्रस्थापित करत आहोत. त्यांची पूर्ण क्षमता प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण एक आराखडा तयार केला पाहिजे. तुमच्या देशात ‘नव्या ताश्कंद’सारखे मोठे प्रकल्प सुरू आहेत; भारतात, आम्ही गुजरातमध्ये गिफ्ट सिटी उभारली आहे. तंत्रज्ञानाच्या वापराचा अभ्यास करू शकणाऱ्या तुमच्या देशातील शिष्टमंडळाचे स्वागत करण्यास आम्हाला आनंद होईल.” असे ही पंतप्रधान म्हणाले.
शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान, राष्ट्रपती मिर्झीयोयेव म्हणाले, “पंतप्रधान मोदी, माझा विश्वास आहे की तुमच्या नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहे, उच्च आर्थिक वाढीचा दर कायम राखत आहे आणि मोठे प्रकल्प राबवत आहे. भारत डिजिटलीकरण, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये खरोखरच विलक्षण प्रगती करत आहे. जागतिक घडामोडींमध्ये नवी दिल्लीचा आवाज आणि प्रभाव आणखी मजबूत झाला आहे. तुमचे जवळचे मित्र म्हणून, ही सर्व उपलब्धी पाहून आम्हाला निश्चितच खूप आनंद होत आहे.”









