Jalgaon News: जळगाव शहरातील महामार्गाच्या समांतर रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा माल वापरला जात असल्याचा आरोप करत, दक्ष नागरिकांनी दादवाडीजवळ चालू असलेले काम रविवारी रात्री दहा वाजता थांबवले. ठेकेदाराला कामाबद्दल जाब विचारून, योग्य दर्जाचे काम करण्याची समज देण्यात आली. ठेकेदाराकडून सुरू असलेल्या भ्रष्ट कामाची पोलखोल जागृत नागरिकांनी केली. अखेर घटना समजताच महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी आले.
दादवाडीजवळचा प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील खोटेनगर ते कालिंकामाता चौक या राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या साईड रोडचे काम सध्या चालू आहे. दादवाडीजवळ हे काम चालू असताना, काही सतर्क नागरिकांच्या हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे लक्षात आले. रस्त्यासाठी वापरली जाणारी खडी आणि सिमेंटचेे प्रमाण योग्य नसल्याचे तसेच, कामाचा दर्जाही चांगला नसल्याचे दिसून आले.

महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी घटनास्थळी
कामाचा निकृष्ट दर्जा पाहून नागरिकांनी तत्काळ काम थांबवले. तेथे उपस्थित असलेल्या ठेकेदार आणि कर्मचार्यांना कामाबद्दल विचारणा केली. तसेच, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात नागरिकांना त्रास सहन करावा लागू शकतो, याची जाणीव ठेकेदाराला करून देण्यात आली. नागरिकांनी या कामाचे फोटो आणि व्हिडिओ देखील घेतले.नागरिकांच्या रोषानंतर, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यांनी कामाची पाहणी करून, नागरिकांची तक्रार योग्य असल्याचे मान्य केले.
प्रशासनाने लक्ष द्यावे
ठेकेदाराला निकृष्ट काम थांबवून, दर्जेदार काम करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकारानंतर महामार्गाच्या कामावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. प्रशासनाने या कामात लक्ष घालून, दर्जेदार काम केले जावे अशी मागणी होत आहे. या सतर्कतेमुळे महामार्गाचे काम दर्जेदार होईल आणि जळगावकरांना सुरक्षित रस्ते मिळण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.










