Jalgaon News: आमदार एकनाथराव खडसे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित या सोहळ्याला राज्यभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी राहणार आहे. त्या अनुषंगाने कोथळी परिसरात उत्साहाचे वातावरण असून मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. तरी, या भव्यदिव्य कार्यक्रमाला २६ ऑगस्टपासून सुरुवात झाली असून विविध अध्यात्मिक कार्यक्रम सुरू असून, विविध राजकीय पक्षांतील दिग्गज नेत्यांची उपस्थिती लक्षवेधी ठरणार आहे. (Platinum Jubilee)
दरम्यान या भव्य सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार, २९ ऑगस्ट रोजी सकाळी आमदार एकनाथराव खडसे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यानंतर रविवार, ३० ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार, भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे प्रमुख मान्यवर कार्यकमाला उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय पालकमंत्री गुलाबराव पाटील, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार चैनसुख संचेती, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि मध्य प्रदेशच्या माजी मंत्री अर्चना चिटणीस यांच्यासह अन्य मान्यवरही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत नाथाभाऊंची गेले अनेक दशकापासून सहभाग राहिला आहे. त्याचा कार्याचा आवाका मोठा आहे. त्याच्या कार्याचा यथोचित सन्मान करण्यासाठी त्यांच्या ७५ वर्षांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या निमित्ताने राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर उपस्थिती लावणार असल्याने, या ‘ना भूतो ना भविष्यती’ अशा या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. त्यामुळे कोथळीकरांसाठी आनंद आणि अभिमानाचा क्षण आहे.
दरम्यान, श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री संत मुक्ताई जुने मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह सुरू असल्याने भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. संत मुक्ताई चरित्र आणि श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.








