Jalgaon News: राज्यात खळबळ उडून देणाऱ्या कथित ‘टेप’ने भाजपच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या संस्कृतीचा मुद्दा पुढे आला आहे. मंत्री गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांच्यातील कथित ऑडिओ क्लिपमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कथित क्लिपमध्ये केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार एकनाथ खडसे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत आमदार खडसे यांचीही प्रतिक्रिया आली असून भाजपच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेषतः पूर्वीचा आणि आताचा भाजपाच्या संस्कृतीत फरक दिसून येत आहे, असे सांगून, त्यांनी पक्षाच्या बदललेल्या राजकीय संस्कृतीवरच टीका केली आहे.

दरम्यान एकनाथ खडसे म्हणाले की, त्यांनी संबंधित कथित ऑडिओ क्लिप ऐकली असून त्यात वापरण्यात आलेली भाषा अत्यंत चुकीची आणि महिलांचा अपमान करणारी असल्याचे स्पष्ट करून अशा प्रकारची वक्तव्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या संस्कृतीला शोभत नाही. असे सांगून भाजपमध्ये पूर्वी अशा प्रकारच्या वर्तनाला कधीच स्थान नव्हते. मात्र आता पक्षात नव्याने आलेल्या काही व्यक्तींमुळे पक्षाची प्रतिमा आणि संस्कृती दोन्हीही मलीन होत आहे, अशी टीका खडसे यांनी करून विजय चौधरी यांना फैलावर घेतले. खडसे म्हणाले की, चौधरी गेल्या अडीच ते तीन दशकापासून दारू व्यवसायाशी संबंधित आहेत. नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे कुटुंब दारूमाफिया म्हणून ओळखले जाते. अशा व्यक्तींना पक्षात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांना सरचिटणीस पद देण्यात आले. त्यामुळे अशा व्यक्तींमुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम करत असल्याचे सांगितले.
तसेच भाजपच्या जुन्या आणि नव्या नेतृत्वाची तुलना करताना खडसे म्हणाले की, पूर्वी पक्षातील वरिष्ठ नेते किंवा मंत्री अशा प्रकारचे वक्तव्य कोणाकडूनही सहन करत नसे. एखाद्या बैठकीवेळी महिलांविषयी अपमानास्पद शब्द वापरले गेले असते, तर त्याचवेळी संबंधित व्यक्तीला रोखण्यात आले असते. मात्र या कथित संभाषणात मंत्री शांतपणे सर्व काही ऐकत आहे. त्यांनी कोणतीही हरकत घेतली नाही किंवा संबंधित व्यक्तीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. हीच सध्याच्या भाजपच्या संस्कृतीतील मोठी घसरण असल्याची टीका त्यांनी केली. रक्षा खडसे यांच्याविषयी वापरण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह भाषेचा निषेध करताना हा विषय केवळ त्यांच्या स्नुषापुरता मर्यादित नाही. तर, कथित संभाषणात नंदुरबारमधील इतर महिलांबाबतही अत्यंत अशोभनीय शब्द वापरण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणात विजय चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिला, हा योग्य निर्णय असल्याचे खडसे म्हणाले. मात्र एवढ्यावर हा विषय संपणार नाही. असे ते म्हणाले. या कथित ऑडिओ क्लिपची माहिती ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहचवणार आहेत. आजही भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांशी आपले चांगले संबंध असल्याचे सांगत त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेण्याचे आवाहन केले तसेच त्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.








