bhusawal News: प्रवाश्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे, रेल्वे स्टेशन येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता रेल्वेने घेतली आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकाला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आधुनिक व अत्यंत कमी शुल्क असलेले प्रतिक्षालाय (वेटिंग रूम) मिळाले आहे. भुसावळचे विभागीय वाणिज्य प्रमुख भानुदास तपस्वी आणि झोनल रेल्वे युजर्स कन्सलटीव्ह कमिटीचे सदस्य जयराम गियलानी यांनी नुकतेच त्याचे उदघाटन केले.
यावेळी नाशिक रोडचे स्टेशन मास्तर मनोजकुमार श्रीवास्तव, मुख्य खंड वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, चीफ बुकींग सुपरवायझर रवी नायर, मुख्य माल पर्यवेक्षक कुणाल खरे, मुख्य तिकीट निरीक्षक विजय धोटे, आरपीएफचे निरीक्षक तिवारी, गुप्तचर विभागाचे महेश कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सरोज आहिरे, यांच्याहस्ते या प्रतिक्षागृहाचे उदघाटन होणार होते. मात्र, तिघेही व्यस्थतेमुळे ते येऊ शकले नाही. त्यामुळे दोन तास उशिराने उदघाटन झाले.

या प्रतिक्षालयात पूर्णपणे वातानुकूलित प्रीमियम सोफा आसनव्यवस्था असून प्रवाशांना मोफत हाय-स्पीड वायफाय, चोवीस तास चहा, कॉफी व अल्पोपहार सुविधा, स्वच्छ व आधुनिक प्रसाधनगृहे तसेच शॉवर सुविधा उपलब्ध आहे. वृत्तपत्रे व मासिकांसह वाचन कक्ष, रेल्वे गाड्यांची व डब्यांची डिजिटल माहिती प्रणाली, ट्रॅव्हल असिस्टन्स डेस्क, सीसीटिव्ही सुरक्षा व्यवस्था, सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र लगेज रॅक्स, संपूर्ण डिजिटल बुकिंग व कॅशलेस बिलिंग व्यवस्था या सुविधाही उपलब्ध आहे.
पहिल्या तासासाठी वीस रूपये त्यानंतर प्रत्येक तासाला पंधरा रुपये नाममात्र शुल्कात हे प्रतिक्षालय उपलब्ध आहे. विमानतळाच्या धर्तीवरील आरामदायी आणि आधुनिक अनुभव देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे कंत्राटदार कमलाक्ष नाईक यांनी आभार मानले. फलाट क्रमांक दोनवर एकही प्रतिक्षालय नाही तेथेही लवकरच असे वातानुकुलीक, आधुनिक प्रतिक्षालय साकारणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.








