Pune News: पुण्यात २२ ऑगस्ट रोजी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाची तयारी जोरात सुरू असून पोलिसांनी काही अटींवर या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. राहुल गांघी यांच्यानंतर पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना ही निमंत्रण देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राज्यातील प्रकल्पांना गती देण्यासाठी दिल्लीत पंतप्रधान नरेंद मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी पुण्यातील मेट्रोच्या उदघाटनासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांच्या दौऱ्याची अधिकृत तारीख अजून जाहीर झालेली नाही, तरी लवकरच ते ही पुण्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठोपाठ दौरा होण्याची शक्यता असल्याने विरोधी पक्षनेते गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील जुगलबंदी पाहायला मिळणार का? याकडे देशासह राज्याचे लक्ष लागून आहे.
जेन-झी आणि युवकांशी संवाद
राज्यातील काँग्रेसचे नेते पुण्यात एकत्र आले असून, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी गेल्या अनेक दिवसांपासून नियोजन करण्यात व्यस्त आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांपासून राष्ट्रीय पातळीवरील अनेक नेत्यांनी गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून पुण्यात ठाण मांडले आहे. या कार्यक्रमाला काही अटी शर्थींवर पोलिसांनी परवानगी दिली आहे.
देशभरात काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ‘जेन-झी’ आणि युवकांच्या प्रश्नांवर थेट संवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेणार आहे. त्यामुळे ते नेमके काय बोलतात याकडे लक्ष लागून आहे. त्यांच्या या कार्यक्रमाला युवकांची गर्दी होण्याची शक्यता आहे.

पुणे मेट्रो उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण
महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि दळणवळण क्षेत्रातील प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रांच्या भेटी घेतल्या. पुणे मेट्रो-३ प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात आलेली ही देशातील नवीन धोरणांतर्गत पहिली सार्वजनिक- खासगी भागीदारी पद्धतीची मेट्रो आहे.
चाचण्या पूर्ण झाल्यानंतर या प्रकल्पाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना निमंत्रण दिले. त्यांचा अधिकृत दौरा अद्याप जाहीर झालेला नाही, मात्र मुख्यमंत्री फडणवीस हे स्वतः दिल्लीत जाऊन त्यांना येण्याचे निमंत्रण दिल्याने ते येतात का? याकडे लक्ष लागले आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्यासोबतची भेट अत्यंत सकारात्मक आणि फलदायी झाली, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यामुळे पंतप्रधान लवकरच राज्याच्या दौऱ्यावर येतील अशी शक्यता आहे.











