Mumbai News: दिल्लीतील आंदोलनाची घग आता महाराष्ट्रातही पोहचली आहे. विद्यार्थ्यांसाठी आता ठाकरे बंधू एकत्र मैदानात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे बंधू एकत्रित मोर्चा काढणार आहेत. मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी २६ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढणार आहेत. आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूनी मोर्चाची घोषणा केली.
२६ जुलैला मोर्चा
विद्यार्थ्यांच्या लाठीचार्जचा हा मुद्दा आता पंतप्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत गेला आहे, असे राज ठाकरे म्हणाले. रविवारी २६ जुलैला छत्रपती शिवाजी पार्कपासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात विद्यार्थ्यांसह पालकांनी देखील सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरेंनी यांनी केले आहे. तसेच कोणत्याही पक्षाचा झेंडा या मोर्चात नसेल, फक्त तिरंगा असेल, असे ठाकरे बंधूंनी सांगितले. प्रश्न सोडवायचा की चिघळवायचा हे आता तुम्ही बघा, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान या आंदोलनात शरद पवारही सहभागी होऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील येऊ शकतात. विद्यार्थ्यांच्या बाजूने आणि विरोधात कोण हे कळेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. २६ जुलैच्या मोर्चात दिल्लीसारखे कोणाला घुसवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना फटकावून काढू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री काय म्हणाले
दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी आठवण करुन देतो, राज्यातला सर्वात मोठा टीईटी घोटाळा उद्धव ठाकरे मु्ख्यमंत्री असताना झाला. त्यामध्ये आयएएस अधिकाऱ्यांपासून सगळे सहभागी होते. असा मोठा घोटाळा राज्याच्या इतिहासात झाला नाही. बरे केवळ टीईटी घोटाळाच झाला नाही, तर जे नापास होते, त्यांना पास करण्याचं काम उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.तसेच आम्ही टीईटी परिक्षेत घोटाळा होत असल्याचं लक्षात येताच, परिक्षेआधी घोटाळेबाजांना अटक केली. दुसऱ्यांचे वाकून बघण्याची सवय बंद करा, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी मारला.









