Mumbai News: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पुन्हा लांबण्याची चिन्हे आहेत. डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता कमी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राज्य निवडणूक आयोगांना स्पष्ट निर्देश दिले आहे की, एसआयआर (SIR) मोहीम पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये. या निर्देशानुसार, ऑक्टोबर महिन्यात प्रसिद्ध होणाऱ्या मतदार याद्या या केवळ विधानसभा मतदारसंघनिहाय असणार आहेत. त्यानंतर २० जिल्हा परिषदा आणि २९१ पंचायत समित्यांनुसार या याद्यांची प्रभागनिहाय विभागणी करून या प्रक्रियेवर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविल्या जातील. हे काम नोव्हेंबर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात राज्य निवडणूक आयोग प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
एकंदरीत एसआयआर (SIR) च्या कामामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील वर्षी होण्याची शक्यता आहे. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडणुका घ्याव्या, अशी केंद्रीय आयोगाची भूमिका आहे. २० जिल्हा परिषदा आणि २९१ पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. एसआयआरची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात याव्यात अशा सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यांना दिल्या आहेत.

त्यामुळे २० जिल्हा परिषदा आणि २९१ पंचायत समित्या या निवडणुका यंदाच्या डिसेंबर किंवा पुढील वर्षाच्या जानेवारी २०२७ आधी होण्याची शक्यता कमी आहे. तसेच १०५ नगरपंचायतीच्या निवडणुकांची मुदत फेब्रुवारी २०२७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे पुढील वर्षी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता आहे. तर ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या २० जिल्हा परिषद आणि त्यांच्या अंतर्गत पंचायत समितीच्या निवडणुकांचे भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती अवलंबून आहे. विशेष सखोल पुनरीक्षणाची मोहीम वेगाने सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. ‘एसआयआर’चे काम डिसेंबरपर्यंत चालण्याची शक्यता आहे.









