Nepal Flash Flood: नेपाळमधील विनाशकारी पूर आणि भूस्खलनानंतर एक नवा धोका समोर आला आहे. याठिकाणी दोन जलाशय तयार झाले आहे. एका तलावातून सतत पाणी गळत आहे, तर दुसऱ्या तलावाचा आकार वाढत आहे. आणखी एक पूर किंवा भूस्खलनाच्या शक्यतेने अधिकाऱ्यांची चिंता वाढवली आहे. नेपाळ-चीन सीमेजवळील भूस्खलनानंतर हे दोन जलाशय तयार झाले आहेत. यापूर्वी याच भागात अचानक आलेल्या पुरामुळे हाहाकार माजला आहे. त्याठिकाणी चिखल, वाळू, खडी आणि मोठे दगड प्रवाहाच्या दिशेने वाहून गेले, नेपाळमध्ये अचानक आलेल्या विनाशकारी पुरामुळे (flash floods) शनिवारी मृतांची संख्या ६२६ वर पोहोचली आहे. दरम्यान, बचाव पथके शोध आणि मदतकार्य राबवत आहेत. सुमारे २,५०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असले, तरी २४०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत. त्यात ४०० भारतीय नागरिक आहे.
बुधवारी नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे बर्फ आणि खडकांचे प्रचंड स्खलन झाले. यामुळे पाणी, चिखल आणि अवशेषांचा लोंढा मध्य नेपाळमधून वेगाने खाली वाहून आला, ज्याने अनेक शहरे व गावांची नासधूस केली, घरे, वाहने, रस्ते व पूल वाहून नेले आणि जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान केले.

मुख्य रस्ते आणि महामार्गांपासून संपर्क तुटला
पूर आणि भूस्खलनामुळे नेपाळ-चीन सीमेला जोडणारा पासांग ल्हामू महामार्गाचा ४० किलोमीटरहून अधिक भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. यामुळे उत्तरेकडील रसुवा जिल्ह्याचा देशाच्या उर्वरित भागाशी संपर्क तुटला आहे. ग्यिरोंग बंदराकडे जाणारा महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्गही बंद आहे.
तिबेटमधील पुराने हाहाकार
चीनच्या सरकारी माध्यमांनी तिबेटमधील पुराच्या विध्वंसाची नवीन छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. त्यामध्ये परिसर पूर्णपणे चिखल आणि दगडांनी झाकलेला दिसत आहे. बचाव पथकाचे सदस्य ढिगाऱ्यांमध्ये लोकांचा शोध घेताना दिसत आहेत. डोंगर पार करून, खडकांवर चढून आणि वेगाने वाहणाऱ्या नद्या ओलांडून बचाव पथके शुक्रवारी दुपारी ग्यिरोंग बंदरावर पोहोचली. तिबेटमधील पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या भागांपैकी हा एक आहे. ग्यिरोंग बंदर हा नेपाळ आणि तिबेट दरम्यान पर्यटक आणि वाहनांच्या वाहतुकीसाठी एक प्रमुख मार्ग होता. उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांनुसार, हा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या परिसरात किमान ५५४ लोक बेपत्ता तर सात जणांच्या मृत्यूची पुष्टी झाली आहे.








