Nandurbar News: अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निंबापाटी परिसरासह विविध पाड्यांमध्ये स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही मूलभूत सुविधांचा भीषण अभाव दिसून येत आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, स्मशानभूमी, वीज, आरोग्य आणि शाळा यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या व जीवनमरणाशी जोडलेल्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांमुळे येथील आदिवासी बांधवांचे जगणे अत्यंत असह्य झाले आहे. प्रशासनाकडून सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाच्या विरोधात आणि या सर्व प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी ‘युवा क्रांती नंदुरबार या सामाजिक संघटनेच्या वतीने अक्कलकुवा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तसेच विविध मूलभूत समस्या सोडवण्यासाठी ७ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
मूलभूत सुविधांची वाणवा
वालंबा ग्रामपंचायतीमधील विविध पाड्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. निंबापाटी येथील पाटीलपाडा येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही कायमस्वरूपी सोय नसल्यामुळे येथील महिला व ग्रामस्थांना पाण्यासाठी थेट नदीच्या पात्रात उतरावे लागत आहे. याशिवाय पाटीलपाडा, राऊतपाडा आणि माथाकुंडपाडा या तिन्ही ठिकाणी स्वतंत्र स्मशानभूमीच उपलब्ध नाही. त्यामुळे स्वातंत्र्यापासून आजतागायत उघड्यावरच अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ येथील ग्रामस्थांवर येत आहे.
नव्या शाळा इमारतीचे काम अर्धवट
शिक्षण क्षेत्राची दुरवस्था पाहता, निंबापाटी गावांतर्गत येणाऱ्या पाटीलपाडा, राऊतपाडा, माथाकुंडपाडा व गालीडोंगपाडा येथील मुले राऊतपाडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिकतात. मात्र, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झाल्यामुळे नादुरुस्त दाखवून पाडण्यात आली आणि नवीन इमारत मंजूर झाली. परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे ही इमारत अद्याप अपूर्ण असल्याने लहान मुलांना अंगणवाडीच्या दाटीवाटीच्या इमारतीत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे.
रस्त्यांची दुरावस्था
दळणवळणाचा विचार केला असता, माथाकुंडपाडा ते राऊतपाडा, गालीडोंगपाडा आणि चपलाईपाडा येथील रस्त्यांचे काम केवळ खोदकाम करून अर्धवट सोडून देण्यात आले आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड चिखल होत असल्याने वाहने अर्ध्या रस्त्यातच सोडून लोकांना पायी प्रवास करावा लागतो. या दळणवळणाच्या अभावामुळे गरोदर महिला व गंभीर रुग्णांना बांबूची झोळी करून रुग्णालयात न्यावे लागते; तर वेळेवर उपचार न मिळाल्याने काही रुग्ण दगावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत.तसेच ढाडीपाडा येथे रस्त्याचे काम अपूर्ण असून नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात पुरामुळे या पाड्याचा संपर्क पूर्णपणे तुटतो आणि गावात एखादी दुर्दैवी घटना घडल्यास नातेवाइकांनाही येणे अशक्य होते.
विजेचा लपंडाव
या व्यतिरिक्त, वीज पुरवठ्याच्या बाबतीत राऊतपाडा येथे वीज कंपनीने फक्त दोन तारा टाकून काम पूर्ण झाल्याचा बनाव केला आहे. वारंवार वीज जात असल्याने रात्रीच्या वेळी हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. चपलाईपाडा येथे ट्रान्सफॉर्मर (डीपी) व हातपंप गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत आणि उमरपाडा येथे अनेक घरांत अजून वीज पोहोचलेली नाही. गालीडोंगपाडा येथे ‘जल जीवन मिशन’चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. तसेच, पंचायत समितीमार्फत मिळणारे वैयक्तिक गोठ्यांचे थकीत अनुदानही लाभार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही.

या सर्व गंभीर बाबींवर प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी निवेदन देताना युवा क्रांतीचे प्रदेश समन्वयक विजयसिंग पाडवी, जिल्हा आयटी सेल प्रमुख इंजि. अजय वसावे, अक्कलकुवा तालुकाप्रमुख धिरसिंग वसावे, मगन वसावे, शंकर वसावे, कांतीलाल वसावे, वीरसिंग वसावे, शैलेश वसावे, मेहुल वसावे, जयराम वसावे, विकास वसावे, राकेश वसावे, मानसिंग वसावे,राजेंद्र वसवे मिरदर वसावे, मिथुन वसावे, महेश वसावे सुनील , रमण वसावे, राहुल वसावे कल्पेश वसावे,जालमसिंग वसावे, दिलीप वसावे, विपुल वसावे,यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे युवा क्रांती ग्राम समिती अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
७ दिवसांचा अल्टिमेटम
येत्या ७ दिवसांच्या आत प्रशासनाने या सर्व समस्यांवर ठोस उपाययोजना करून कामे सुरू न केल्यास ‘युवा क्रांती’ संघटनेच्या वतीने अक्कलकुवा पंचायत समितीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.









