Pandharpur News: ‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’ या संत महात्म्यांच्या विचारांचा संदेश देत, आषाढी एकादशी निमित्त गेल्या कित्येक वर्षांपासून अविरत सुरू असलेल्या सामाजिक उपक्रम यावर्षी सुद्धा तितक्याच जोमाने राबविण्यात आला. महाराष्ट्राच्याच नव्हे तर, संपूर्ण भारताच्या कानाकोपऱ्यातून कोसो मैल विठूरायाच्या दर्शनासाठी वारकरी पायी चालत येतात. या आलेल्या वारकऱ्यांसाठी आषाढी एकादशीचे औचित्य साधून उपवासाचे फराळ वाटप उपक्रम यंदा ही राबविला. यावेळी एकूण १०० किलोच्यावर फराळाचे वाटप करण्यात आले.
त्यात साबूदाणा खिचडी, मठ्ठा, आलूचिप्स, केळी, शेंगदाणा व खजूर लाडू, फराळी चिवडा आदींचा समावेश होता. हा उपक्रम विठूरायाच्या मंदिराच्या मार्गावर असलेल्या वृंदावन कॉलनीे येथे आयोजित केला गेला असून दर्शनासाठी जाणाऱ्या येणाऱ्या बऱ्याच दिंड्या व वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतला. या सामाजिक कार्याची सुरुवात अमरावतीचे रहिवासी अनुप उर्फ बाळासाहेब झाडे यांनी केली.

दरम्यान झाडे यांच्या या उपक्रमात गेल्या काही वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील बरेच हौशी तरूण जोडल्या गेले आहेत, त्यामध्ये मुकुंद वानखडे व त्यांचे वडील श्रीधरराव वानखडे, घनश्याम चुने, वरूड तालुक्यातील काटी येथील रहिवासी मयूर घाटोळे व अंजनगाव सुर्जी येथील कवी अमित भांडे व त्यांचे वडील राजेंद्र भांडे या सर्वांचा विशेष सहभाग लाभला असून या सर्व वैदर्भीय वारकऱ्यांनी सदर उपक्रमात ‘राम कृष्ण हरी’ च्या जयघोषात वारकऱ्यांची सेवा करून मानवतेचा संदेश देत मोठ्या उत्साहात हा उपक्रम पार पाडला.










