होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वीजबिल वसुलीस गेलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ला; जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, धुळ्यात ८ जणांवर गुन्हा दाखल

On: September 3, 2026 3:46 PM
Follow Us:
---Advertisement---

Dhule News: वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या पथकास ग्राहक व त्याच्या हस्तकांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ही खळबळजनक घटना धुळे तालुक्यातील बाळापूर शिवारात बुधवारी सायंकाळी घडली. संशयित एवढ्यावरच न थांबता एका कर्मचाऱ्यावर दांडक्याने हल्ला करत ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी ८ आरोपींवर भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील विविध १४ कलमांन्वये रात्री उश‍िरा गुन्हा दाखल करण्यात आला.

महावितरणची थकबाकीदारांवर कारवाई

मिळालेली माहिती अशी की, महावितरणतर्फे सध्या वीजबिल थकबाकी वसुली मोहीम सुरू आहे. ४५ दिवसांपासून बिल न भरलेल्या ५ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची थकबाकी असले‌ल्या ग्राहकांच्या याद्या वरिष्ठ कार्यालयाकडून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येतात. त्यानुसार वसुली पथक संबंधित ग्राहकाच्या घरी किंवा दुकानावर जाऊन त्यांना वीजबिल भरणा करण्याची विनंतीवजा सूचना देते. जर ग्राहकाने बिल भरले नाही तर त्याचा वीजपुरवठा खंडित करून त्या ठिकाणी नवीन स्मार्ट मीटर लावले जात आहे.

अशी घडली घटना

त्यानुसार ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ५:३० वाजे दरम्यान धुळे येथील फागणे उपविभागाचे सहायक अभियंता प्रवीण भामरे, ‍आशिष कासार, प्रधान तंत्रज्ञ रविंद्र चौधरी, तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील, वरिष्ठ तंत्रज्ञ इंद्रजित नाईक, बाह्यस्रोत तंत्रज्ञ रूपेश पाटील हे व्यावसायिक ग्राहकाचे प्रलंबित वीजबिल वसूल करण्यासाठी बाळापूर शिवारातील हॉटेल शांतीसागरजवळील साईसागर ग्रेनाईट मार्बल दुकानावर गेले. या ग्राहकाकडे साडेसहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी आहे. तेथे हजर व्यक्तींना वीजबिल भरण्याची सूचना केली असता योगेश नावाच्या व्यक्तीने ‘आमचे मालक सागर पाटील, आकाश पाटील व ज्ञानेश्वर पाटील बाहेर गेलेले आहेत. मी त्यांना फोन करून सांगतो. ते आल्यावर बिल भरतील’ असे कळविले.

त्यावर सहायक अभियंता भामरे यांनी ‘तुमचे मालक येईपर्यंत कंपनीच्या नियमाप्रमाणे जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवून घेऊ’ असे सांगितले. तेव्हा योगेश हा ‘आमचे मालक येईपर्यंत तुम्ही काहीही करू नका’ असे सांगून तो महावितरणच्या पथकास कर्तव्य पार पाडण्यास अडथळा आणत होता. नियमाप्रमाणे मीटर बदलणे गरजेचे असल्याने अभियंता भामरे यांनी तंत्रज्ञ चंद्रकांत पाटील यांना साईसागर ग्रेनाईट मार्बल दुकानाबाहेर असलेल्या विद्युत खांबावर चढून वीजपुरवठा खंडित करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील वीजपुरवठा खंडित करून खांबावरून उतरले.

कंपनीने नियुक्त केलेल्या स्मार्ट मीटर कंपनीचे प्रतिनिधी अभिषेक पाटील व त्यांचा सुपरवायजर विनय ठाकुर असे दोघेही त्या दुकानाचे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याच्या तयारीत असतानाच साईसागर ग्रेनाईट मार्बल दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील व ज्ञानेश्वर पाटील असे एका गाडीतून दुकानाच्या आवारात आले. ‘लाईन कोणी बंद केली रे’, असे त्यांनी रागात विचारले. तेव्हा दुकानात असलेल्या योगेशने सागर पाटील याला चंद्रकांत पाटील यांच्याकडे बोट दाखवून त्यांनी दुकानाचा सप्लाय कट केल्याचे सांगितले. तेव्हा सागर पाटील याने ‘ऐ योगेश, ऐ बॉबी, घ्या रे यांना साईडला’ अशी चिथावणी देऊन त्यांना मारण्यास प्रवृत्त केले. त्याप्रमाणे योगेश आणि एका अनोळखी व्यक्ती अशा सर्वानी चंद्रकांत पाटील यांना अर्वाच्य शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला

दुकानातील आणखी इतर ३ अनोळखी व्यक्ती पळत आले, त्यांनीही हाताबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यासोबत दुकानाचे मालक सागर पाटील, आकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील हे चंद्रकांत पाटलांची कॉलर धरून दमदाटी करत लाथांनी मारहाण करत असताना लांब बाह्याचा टी शर्ट घातलेल्या अनोळखी व्यक्तीने दुकानाच्या बाजूला पडलेल्या लाकडाचा जाड दांडका उचलून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चंद्रकांत पाटील यांच्या डोक्यावर मारला. पण तो वार चंद्रकांत पाटील यांनी चुकवून त्यांच्या उजव्या खांद्यावर घेतला. त्यामुळे ते जमिनीवर खाली पडले.

त्यांनतर वसुली पथकातील इतर सदस्यांनी चंद्रकांत पाटील यांची आरोपींच्या तावडीतून सुटका करत त्यांना तातडीने उपचारासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. तपासणीत चंद्रकांत पाटील यांच्या उजव्या खांद्यावर फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाले.

या घटनेनंतर संबंधितांकडून मोठ्या प्रमाणावर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदेशीर कारवाईची भूमिका कायम ठेवली. या ठाम भूमिकेमुळे रात्री १२:१६ वाजता पोलिसांनी एफआयआर दाखल केला. गुन्हा दाखल करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांसह ७ अभियंते व ८ तांत्रिक कर्मचारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात तब्बल ५ तास ठाण मांडून बसले होते.

१४ विविध कलमांखाली गुन्हे दाखल

याप्रकरणी सहायक अभियंता भामरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सागर पाटील, आकाश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, योगेश (पूर्ण नाव माहीत नाही), एका अनोळखी व्यक्ती (लांब बाह्याचा टी शर्ट घातलेला, कदाचित तो बॉबी असावा) व त्यांच्यासोबतच्या 3 अनोळखी व्यक्तींवर संगनमताने एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा, तंत्रज्ञास अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की, हाताबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण, लाकडी दांडक्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने वार करून उजव्या खांद्यावर मारत गंभीर दुखापत करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच महावितरण पथकाला उद्देशून येथे पुन्हा लाईट कट कायला आले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी भामरे यांच्या फिर्यादीवरून सर्व ८ आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१) (जीवे मारण्याचा प्रयत्न), १३२ (शासकीय कामात अडथळा व हल्ला), १२१ (१), १२१ (२) (गंभीर दुखापत), १८९ (२), १९१ (२), १९०, ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३५१ (३) आणि महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७ (१), ३७ (३), १३५ अन्वये धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment