होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सुरगाणा-दिंडोरी-पेठमध्ये भूकंपाचे धक्के, कळवणमध्ये प्रथमच हादरे; भिंती-खिडक्या हलल्या, आश्रमशाळेच्या भिंतींना तडे..

On: July 27, 2026 3:43 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, दिंडोरी आणि पेठ तालुक्यांमध्ये सलग दोन दिवस शनिवारी आणि रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले, तर कळवण तालुक्यात प्रथमच भूकंपाची नोंद झाली आहे. या धक्क्यांमुळे काही ठिकाणी घरांच्या भिंती, खिडक्या हलल्याचे नागरिकांनी सांगितले असून पेठ तालुक्यातील शासकीय आश्रमशाळेच्या भिंतींना तडे गेल्याची घटना समोर आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर असून या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.६ इतकी नोंदवण्यात आली आहे.

सुरगाणा- दिंडोरी-कळवणला हादरे

नाशिक जिल्ह्यात शनिवारी सकाळी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव तसेच दिंडोरी तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने यंत्रणा सतर्क केली होती. नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरगाणा तालुक्यातील बोरगाव आणि परिसराचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला होता. शनिवारी रात्री उशिरा आणि रविवारी पहाटेच्या सुमारास सुरगाणा, पेठ, दिंडोरी आणि कळवण या चार तालुक्यांमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवले. प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील दळवट परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ५६ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. हा धक्का सुमारे २० ते ३० सेकंद जाणवला. यावेळी घरांच्या भिंती, खिडक्यांच्या काचा तसेच खिडक्या हलल्याचे नागरिकांनी प्रशासनाला कळवले.

सुरगाणा तालुक्यातील बोरगाव परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. शनिवारी मध्यरात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी हा धक्का जाणवल्याची माहिती नागरिकांनी प्रशासनाला दिली. याच तालुक्यातील सराड, चिखली आणि इतर परिसरातही शनिवारी मध्यरात्री तसेच रविवारी पहाटे २ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी सराड येथील शासकीय आश्रमशाळेच्या भिंतींना मोठे तडे गेल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

पेठ तालुक्यात पहाटे भूकंप

पेठ तालुक्यातील शिवसेना गाव परिसरात रविवारी पहाटे २ वाजून ४४ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. तर दिंडोरी तालुक्यातील ननाशी आणि गाडगी वाडा परिसरात शनिवारी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्रशासनाला देण्यात आली आहे.नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा प्रशासनाने सीएसआयआर-एनजीआरआय येथील भूकंपमापन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर भूकंपाचा केंद्रबिंदू नाशिकपासून ४५ किलोमीटर अंतरावर असल्याचे स्पष्ट करण्यात आले. रिश्टर स्केलवर ३.६ तीव्रतेची नोंद झाली आहे.

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले आवाहन

दरम्यान सातत्याने जाणवत असलेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment