Jalgaon News: जळगावमधून एक महत्त्वाची घटना समोर आली आहे. जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील चावलखेडा गावातील सुरेश भील हे पुराच्या पाण्यात तब्बल पाच तास एका झाडावर अडकून पडल्याची घटना घडली. पावसामुळे परिसरात पाणी वाढल्याने त्यांच्या अवतीभवती पाण्याचा वेढा पडला आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी झाडावर चढले तर, समोर विषारी नाग असे दुहेरी संकट उभे ठाकले होते. थोडा संयम बाळगून त्यांनी पाण्याची पातळी कमी होण्याची वाट बघितली, जसे पाणी ओसरले त्यांनी लागलीच नदी पार करत आपली सुटका करून घेतली. त्यानंतर एका वृत्त वाहिनीशी बोलतांना त्यांनी हा थरारक अनुभव कथन केला.
मासेमारीसाठी गेले अन् अडकले
दरम्यान इकडे आड आणि तिकडे विहीर अशी कोंडी झालेल्या सुरेश भील यांनी आपला अनुभव सांगितला. भील हे नदीमध्ये मासेमारीसाठी गेले होते, नदीची पातळी अचानक वाढल्याने पाण्याचा प्रवाह वाढला, त्यांना बाहेर पडणे शक्य झाले नाही. कसे-बसे जीव मुठीत धरून त्यांनी झाडावर चढण्याचा निर्धार केला. ते झाडावर चढून बसले आणि आपला जीव वाचविला.
दुहेरी संकट
दरम्यान संकट अद्याप टळलेले नव्हते, एका संकटानंतर आणखी एक संकट वाट पहात होते झाडावर जीव वाचवण्यासाठी झाडावर चढले तर खरे परंतु समोर सुरेश भील यांच्यासमोर आणखी एक मोठे संकट उभे राहिले. समोर होता एक विषारी नाग, त्याच झाडावर ते चढले होते. नागाला बघितल्याबर भीती वाटली पण प्रचंड भीतीत स्वतःला सावरत धीर देत सांभाळे. एकीकडे खाली वेगाने वाहणारे पुराचे पाणी आणि दुसरीकडे झाडावर नाग, अशा दुहेरी संकटात त्यांनी धाडस दाखवले. शांतपणे परिस्थितीला सामोरे जात, त्यांनी झाडाच्या फांद्या तोडून त्या नागांना खाली पाण्यात लोटले आणि स्वतःचा जीव वाचविला, काळ आला होता पण वेळ आली नव्हती, असेच म्हणावे लागेल.

पाण्याची पातळी काहीशी कमी झाल्यानंतर सुरेश भील यांनी न घाबरता पोहून सुरक्षित किनारा गाठला. स्वतःची सुटका झाल्यानंतर त्यांनी आपल्या स्थानिक अहिराणी भाषेत सर्व ग्रामस्थ आणि प्रशासनाचे आभार मानले. आपल्याला वाचवण्यासाठी संपूर्ण गावकऱ्यांनी प्रयत्न केले. तसेच परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धरणातून सोडण्यात येणारे पाणी कमी केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि तहसीलदारांचे आभार मानले.








