Jalgaon news: जळगाव :सुरत–नागपूर नॅशनल हायवेवरील पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या भरावाचा काही भाग खचल्याची घटना समोर आली होती. या घटनेची गंभीर दखल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले असून तसेच या पुलाच्या प्रकल्पात काम केलेल्या अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील पाळधी ते तरसोद बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाच्या भरावाचा काही भाग अचानक खचल्याने या प्रकल्पाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले. हा पूल येथील रहदारीसाठी महत्त्वाचा आहे. या घटनेनंतर जळगावच्या खासदार स्मिता वाघ यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री रास्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकराची चौकशी करण्याची मागणी केली.

त्यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत मंत्री गडकरी यांनी तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. दरम्यान या चौकशीत संबंधित कंत्राटदार दोषी आढळल्यास त्याला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश गडकरी यांनी यावेळी दिले. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या अधिकारी आणि संबंधितांवर कठोर केली जाईल, असे गडकरी यांनी सांगितले. निकृष्ट दर्जाची कामे कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नसल्याचा इशारा ही दिला.
दरम्यान, हा रेल्वे पूल खचल्याच्या घटनेची केंदीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल घेत कारवाई करण्याचे निर्देश दिले असून या घटनेनंतर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आदिंनी या ठिकाणे भेट देऊन पाहणी केली. या घटनेने राष्ट्रीय महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेचे बिंग फुटले असून जळगावकरांनी ही नाराजी दर्शविली आहे. मंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिले असले तरी या प्रकरणात नेमकी काय कारवाई होईल हेच पुढे बघावे लागणार आहे.








