Amalner News: अमळनेर विधानसभा मतदारसंघ हा पारंपरिकदृष्ट्या अवर्षणग्रस्त व दुष्काळप्रवण म्हणून ओळखला जातो. अनियमित पर्जन्यमान, भूजल पातळीतील सातत्याने होणारी घट, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि अपुऱ्या सिंचन सुविधांमुळे येथील शेतकऱ्यांना दरवर्षी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या उद्देशाने विद्यमान आमदार अनिल पाटील यांनी दूरदृष्टी ठेवत आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या दुष्काळ शमन व मृद व जलसंधारण उपाययोजना अंतर्गत सुमारे १०,२६९.६५ लाख निधीतून ३० आर्च बंधारे व संरक्षण भिंतींच्या कामांना मंजुरी मिळवून दिली. राज्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या अभिनव पायलट प्रकल्पामुळे अमळनेर मतदारसंघातील अनेक गावांमध्ये जलसाठा निर्माण झाला असून भूजल पुनर्भरण, सिंचन क्षमता वाढ, मृद संवर्धन, पूरनियंत्रण आणि ग्रामीण पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा आधार मिळाला आहे.
दुष्काळमुक्त अमळनेरचे स्वप्न
लोकप्रतिनिधी झाल्यापासूनच आ. अनिल पाटील यांनी अमळनेरच्या दुष्काळी परिस्थितीचा अभ्यास करून जलसंधारणावर आधारित विकासाचा आराखडा तयार केला होता. निम्न तापी पाडळसरे धरणासह नदी-नाल्यांवरील लघु व मध्यम जलसाठे निर्माण करून पावसाचे पाणी गावातच अडविणे, भूजल पुनर्भरण वाढविणे आणि शेतीला वर्षभरासाठी पाण्याचा स्थिर स्रोत उपलब्ध करून देणे हे त्यांच्या नियोजनाचे प्रमुख उद्दिष्ट होते. महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री झाल्यानंतर त्यांनी या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप दिले. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून दुष्काळ शमन, मृद संवर्धन, जलसंधारण आणि नैसर्गिक साधनसंपत्ती संवर्धन यांचा समन्वय साधत आर्च बंधाऱ्यांची अभिनव पायलट योजना मंजूर करून घेतली. या माध्यमातून अमळनेर मतदारसंघातील विविध नदी-नाल्यांवर आर्च बंधारे, संरक्षण भिंती आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू झाले.

आर्च बंधारा- आधुनिक जलसंधारणाची प्रभावी संकल्पना
आर्च बंधारा (Arch Dam/Arch Weir) हा जलसंधारण क्षेत्रातील आधुनिक व अभियांत्रिकी दृष्ट्या अत्यंत प्रभावी प्रकार मानला जातो. कमानीच्या आकारात बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यामुळे पाण्याचा दाब थेट संरचनेवर न येता दोन्ही बाजूंच्या खडकाळ काठांवर समान रीतीने वितरित होतो. त्यामुळे कमी काँक्रीटमध्ये अधिक मजबूत, सुरक्षित आणि दीर्घकालीन टिकाऊ संरचना उभारणे शक्य होते. या बंधाऱ्यांमुळे पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी प्रभावीपणे अडविले जाते, भूजल पुनर्भरण वाढते, विहिरी व कूपनलिकांची पाणीपातळी उंचावते, नदीकाठावरील शेतीला वर्षभर ओलावा मिळतो, सिंचनाखालील क्षेत्र वाढते, मृदा धूप कमी होते आणि पूरस्थितीत पाण्याचा वेग नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
भूजल पुनर्भरणामुळे अमळनेर टँकरमुक्तीकडे
या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम यंदाच्या वर्षी भूजल पातळीत झालेल्या वाढीच्या स्वरूपात दिसून येत आहे. आर्च बंधाऱ्यांमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात अडविले जाऊन जमिनीत मुरत असल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर स्रोत तसेच ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या जलस्रोतांमध्ये समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यापूर्वी उन्हाळ्यात अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होत असल्याने शासनाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असे. या व्यवस्थेवर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शासकीय निधी खर्च होत होता. मात्र यंदा भूजल पातळी वाढल्यामुळे अनेक गावांमध्ये टँकरची आवश्यकता लक्षणीयरीत्या कमी झाली असून काही गावे टँकरमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. परिणामी शासनाचा टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ
आर्च बंधाऱ्यांमुळे निर्माण झालेल्या जलसाठ्याचा थेट लाभ शेती क्षेत्राला होत आहे. सिंचनासाठी उपलब्ध पाण्यात वाढ झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामातील क्षेत्र वाढत असून दुबार व तिबार पीकपद्धतीला चालना मिळत आहे. फळबाग विकास, पशुपालन आणि पूरक व्यवसायांसाठीही पाण्याची उपलब्धता सुधारत आहे. भूजल पुनर्भरणामुळे ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची कार्यक्षमता वाढली असून नागरिकांना अधिक स्थिर आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा स्रोत उपलब्ध होत आहे.
पूरनियंत्रणासाठी संरक्षण भिंतींचेही योगदान
या योजनेत केवळ आर्च बंधाऱ्यांचा समावेश नसून नदीकाठ संवर्धन, संरक्षण भिंती, तटबंदी आणि पूरप्रतिबंधक संरचना उभारण्याची कामेही करण्यात आली आहेत. त्यामुळे अतिवृष्टीच्या काळात नदीकाठाची धूप कमी होण्यास, गावांचे संरक्षण होण्यास आणि सार्वजनिक तसेच कृषी मालमत्तेचे नुकसान टाळण्यास मोठी मदत होत आहे.
अनेक कामे पूर्ण; उर्वरित अंतिम टप्प्यात
मंजूर करण्यात आलेल्या कामांपैकी अनेक आर्च बंधारे पूर्णत्वास आले असून उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. पूर्ण झालेल्या बंधाऱ्यांमुळे परिसरातील विहिरींमध्ये पाणी टिकून राहू लागले आहे. भविष्यात या प्रकल्पांचा जलसुरक्षा, कृषी उत्पादन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पर्यावरण संवर्धनावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सिंचनसमृद्ध अन् टँकरमुक्त अमळनेरकडे वाटचाल
जलसंधारणाच्या माध्यमातून दुष्काळावर कायमस्वरूपी मात करणे, भूजल पातळी वाढविणे, पिण्याच्या पाण्याची शाश्वत उपलब्धता निर्माण करणे, सिंचन क्षमता वाढविणे आणि टँकरमुक्त गावांची निर्मिती करणे ही या प्रकल्पामागील व्यापक संकल्पना आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा अभिनव पायलट प्रकल्प अमळनेर मतदारसंघाला जलसुरक्षित, कृषीसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असून, भविष्यात राज्यातील इतर दुष्काळग्रस्त भागांसाठीही हा उपक्रम आदर्श मॉडेल ठरू शकतो.
अनिल पाटील, मा.मंत्री तथा आमदार, अमळनेर विधानसभा मतदारसंघ.








