Nashik News: भावली डॅमवर आलेल्या पर्यटकांना मारहाण केल्याची घटना घडली होती. नाशिकमध्ये पुन्हा पर्यटकांवर हल्ला केल्याचा प्रकार समोर आला. पर्यटकांचा राबता असणाऱ्या हरिहर किल्ल्यावरून परतणाऱ्या पर्यटकांच्या वाहनाला अडवून मारहाण आणि दगडफेक केल्याची घटना घडली आहे. त्र्यंबकेश्वर-घोटी मार्गावर बोरीची वाडी परिसरात हा प्रकार समोर आल्याचे सांगण्यात येते. मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून हा वाद झाला. त्यांनतर पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करून त्यांची गाडी वावी हर्ष परिसरात अडवून चालक आणि प्रवाशांना काठी तसेच चापटीने मारहाण करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेची पोलिसांनी दखल घेऊन पर्यटकांना मारहाण करणाऱ्या १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घटना नेमकी काय?
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक हरिहर किल्ल्यावरून वाहनाने परतत असताना मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला. त्यानंतर संबंधितांनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर वावी हर्ष परिसरात पर्यटकांची गाडी अडवून संबधित आरोपींनी चालक आणि वाहनातील प्रवाशांना शिवीगाळ करत मारहाण केली.तसेच वाहनाचे छत आणि बंपर देखील काठी आणि दगडांनी फोडल्याचा आरोप आहे. हल्ल्यादरम्यान आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

१० जणांवर गुन्हा
दरम्यान या प्रकरणी १० आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून तासाभरात चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून पोलीस कसून तपास करत आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटनस्थळे आहेत. याठिकाणी पर्यटक येत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला असून पर्यटकांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याची गरज आहे.








