Accident News: मालेगाव-चाळीसगाव रस्त्यावरील दहिवाल शिवारात बुधवारी भरधाव ट्रक आणि एसटी बस यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील दोन महिला प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर तब्बल 23 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयानक होता की दोन्ही वाहन अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मयत प्रवाशांमध्ये जळगाव जिल्ह्यातील जामनेर आणि एरंडोलच्या महिलांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव बसवंत आगाराची नाशिक-पाचोरा ही बस 40 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जात होती. ही बस मालेगावहून पाचोरा जात असताना दहिवाल शिवारात चाळीसगावकडून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने बसला समोरासमोर धडक दिली. दोन्ही वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघाताची तीव्रता अत्यंत मोठी होती आणि बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ व आक्रोश पसरला. या दुर्दैवी घटनेत इरशाद बी रमजान मणियार (वय 60, रा. जामनेर) आणि सखूबाई किरण माळी (वय 65, रा. एरंडोल) या दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर प्रणिता विनोद ततार (वय 47), राजेंद्र जगन्नाथ ततार (वय 63), आशा राजेंद्र ततार (वय 57) (सर्व रा. संगमेश्वर, मालेगाव), ऋतुजा शुभम सोनजे (वय 24, नाशिक), अरमान नजीम पिंजारी (35, सोयगाव), गोकुळ रामदास भामरे (वय 65), सुनंदा गोकुळ भामरे (वय 60) (दोन्ही रा. नाशिक), सुहाना अझीसा (वय 29), निधा अझीसा (वय 66) (दोन्ही रा. मालेगाव) आणि रत्नाबाई नाना अहिरे (वय 60, टिंगरी, मालेगाव) हे गंभीर जखमी झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. जखमींना त्वरित मालेगाव येथील शासकीय आणि खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले असून, यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
या भीषण अपघातामुळे चाळीसगाव मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे विस्कळीत झाली होती. याप्रकरणी मालेगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अपघातास नेमके कोण जबाबदार आहे, याचा शोध घेत आहेत.








