Israel and Lebanon conflict: अमेरिका आणि इराण यांच्यात होर्मूझ सामुद्रधुनी वरून तणाव कायम असतानाच आज दक्षिण लेबनॉनमध्ये झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये किमान नऊ जण ठार झाले आहेत, असे नॅशनल न्यूज एजन्सीने वृत्त दिले आहे. यापूर्वी इस्रायलने दक्षिण लेबनॉन मधील काही शहरांना हल्ल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हेजबोल्ला आणि इस्रायल यांच्यात ही तणाव निर्माण झाला आहे. .
इस्रायली लष्कराने आपले हल्ले तीव्र केल्यामुळे दक्षिण लेबनॉनमधील आठ शहरांवर हल्ल्याचा इशारा दिला होता. यात अल-समानीह, अल-हनिएह, अल-कलीला, वादी जिलो,अल-कनिसा, काफ्र, मजदल झून सेद्दिकिन या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे इस्रायलच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी हेजबोल्लाने तयारी केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, वॉशिंग्टनने इराणच्या बंदरांवर घातलेली नाकेबंदी यशस्वी ठरली आहे, आणि त्यांनी तेहरानला माघार घेण्याचे आवाहन केले आहे. इराणचे संसद अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी अमेरिकेच्या आर्थिक कोंडी करण्याच्या मोहिम यशस्वी झाल्याचे फेटाळून लावले आहे, तर इराणी लष्कराने इशारा दिला आहे की, आतापर्यंतचा त्यांचा संयम हा राजकारणाद्वारे संधी देण्याच्या उद्देशाने होता.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे जागतिक तेलाच्या किमती प्रति बॅरल १२० डॉलरच्या वर गेल्या होत्या, तरी ब्रेंट क्रूड १ टक्क्याने घसरले असले तरी युद्धजन्य परिस्थिती तशीच असल्याने त्याचा तेल बाजारावर परिणाम दिसून येत आहे. दुसरीकडे अमेरिकेतील पेट्रोलच्या सरासरी किमती चार वर्षांतील उच्चांकावर पोहोचल्या आहेत, असे अल जंजिराने वृत्तात म्हटले आहे.











