Tukaram Mundhe : आपल्या कार्यशैलीमुळे ओळखल्या जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचा नवीन पदभार घेतल्यापासून त्यांनी विविध क्षेत्रात कारवाईचा बडगा उगारला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी असलेल्या तुकाराम मुंढे यांनी आता शाळा आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे मोर्चा वळवला आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये मिळणारा मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि कँटीनमधील आहार पूर्णपणे सुरक्षित, सकस आणि न्यूट्रिशनयुक्त असावा, यासाठी ‘सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र’ ही मोहीम त्यांनी हाती घेतली आहे. त्या दृष्टीने काम करण्याचे आदेश त्यांनी शाळा प्रशासनास दिले आहे. यामुळे आता शालेय पोषण आहारात घोटाळा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
राज्यातील 1 लाखांहून अधिक शाळांमध्ये 2 कोटींहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि चांगल्या गुणवत्तेचा आहार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्या दृष्टीने तुकाराम मुंढे यांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. या नवीन धोरणानुसार, महाराष्ट्रातील कोणत्याही बोर्डाची शाळा असो, सर्व शाळांना हे नियम लागू राहतील. शाळांमधील कँटीन, मध्यान्ह आहार पुरवठादार, वसतिगृहातील मेस तसेच अंगणवाडी ते 12 वी पर्यंतच्या शाळांना अन्न पुरवठा करणाऱ्या संस्थांकडे FSSAI चा वैध परवाना असणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. FSSAI परवाना असलेल्या पुरवठादारांकडूनच अन्न घेता येईल.

जंक फूडवर पूर्णपणे बंदी
यासह शाळेच्या आवारापासून 50 मीटरच्या परिघात हाय फॅट, हाय सॉल्ट आणि साखरयुक्त (HFSS) पदार्थांच्या म्हणजेच जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या नियमांचे तंतोतंत पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची प्राथमिक जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असेल. तसेच शाळांना आहाराची आदर्श केंद्रे बनवण्यासाठी ‘ईट राईट स्कूल’ संकल्पना राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यासह शाळांमध्ये पिण्यायोग्य शुद्ध पाणी आणि स्वयंपाकगृहात उच्च दर्जाची स्वच्छता राखणे बंधनकारक राहणार आहे. या मोहिमेत शिक्षण विभाग आणि समाजकल्याण विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे. नियम भंग करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.










