Jalgaon News: खासगी क्लासच्या शिक्षकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याकडे अयोग्य मागणी केल्याचा प्रकार जिल्ह्यातील जामठी (बोदवड) येथे घडला आहे. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संतप्त नागरिकांचा जमाव संशयित शिक्षकाच्या घरावर चाल करून गेला. यावेळी जमावाने शिक्षकाची कारही पेटवून संताप व्यक्त केला. यावेळी पोलिसांवर देखील जमावाने दगडफेक केली.
मिळालेली माहिती अशी की, अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकार असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू केली. संशयित शिक्षकाच्या घराजवळ जमाव गोळा झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्याने माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संशयित शिक्षकाला ताब्यात घेतले. तसेच पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलीस ठाण्यात आणले. मात्र, संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही जमाव शांत झाला नाही. शिक्षकाला पोलिसांच्या ताब्यात न देता आपल्या ताब्यात द्यावे, अशी मागणी जमावाने केली. त्यामुळे पोलीस आणि जमावामध्ये वाद निर्माण होऊन तणाव निर्माण झाला.

अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या
दरम्यान संशयित शिक्षकाला ताब्यात घेऊन पोलीस पुढील कारवाईसाठी निघाले असताना जमावाने पोलिसांना विरोध केला. त्यातच दगडफेकीमुळे परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.जमाव आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला मागे हटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला.
शिक्षकाची कार पेटवल्याने खळबळ
दरम्यान, संतप्त जमावाने शिक्षकांच्या घराकडे धाव घेत त्याची कार पेटवून दिली. घटनेनंतर पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढविला असून, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनीही जामठी येथे घटनास्थळी भेट दिली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती जाणून घेतली. गावातील शांतता कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
गावात शांतता; पोलिसांचा बंदोबस्त
जमावाकडून जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटनेनंतर जामठी गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण होते. मात्र, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर सध्या गावात शांतता आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. अल्पवयीन मुलीशी संबंधित प्रकरण असल्याने पोलिसांकडून तपासाची गोपनीयता राखली जात आहे. दरम्यान, पोलीस आरोपांची सत्यता तपासत असून कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.








