Bhusaval News: केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘पीएम श्री’ योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयुध निर्माणी परिसरातील पीएम श्री केंद्रीय विद्यालयात नुकतीच उच्चस्तरीय पथकाने भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एनईपी- २०२० च्या अनुषंगाने शाळेत सुरू असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांचा आणि प्रगतीचा या पथकाने सविस्तर आढावा घेतला.या पाहणी पथकाचे नेतृत्व भारत सरकारच्या संयुक्त सचिव गरिमा श्रीवास्तव यांनी केले. यावेळी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी स्वाती हावळे व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राहुल गायकवाड उपस्थित होते. शाळेचे प्राचार्य डी. एस. नंदेश्वर आणि मुख्याध्यापक सुरेश नरहिरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
या भेटीचे प्रमुख आकर्षण ठरले ते शाळेत उभारण्यात आलेल्या ‘स्टेम पार्क’ च्या उपक्रमास सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोपक्रमशीलता आणि संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. उद्घाटनानंतर पथकाने भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला भेट देत विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण पाहिले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाविन्यपूर्ण प्रयोगांचे मान्यवरांनी कौतुक केले.
निरीक्षणादरम्यान शाळेतील आयसीटी-सक्षम वर्गखोल्या, इंटरअॅक्टिव्ह पॅनेलचा वापर तसेच ‘बाला’ उपक्रमांतर्गत इमारतीचा शैक्षणिक साधन म्हणून केलेला उपयोग यांचेही विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी प्राचार्य नंदेश्वर यांनी शाळेतील पायाभूत सुविधा, ग्रंथालय, क्रीडा विभाग आणि कौशल्याधारित शिक्षण याविषयी सविस्तर माहिती सादर केली. ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत शाळेला आदर्श संस्थेच्या रूपात विकसित करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पथकाने सकारात्मक प्रतिसाद देत समाधान व्यक्त केले.






