Jalgaon News: जळगाव-भुसावळ मधून एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर येत आहे. जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांसह ११ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेच्या नेतृत्त्वावर विश्वास दर्शविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाला खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे.
भुसावळ नगरपालिकेतील दोन माजी नगराध्यक्षांसह तब्बल ११ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भुसावळच्या स्थानिक राजकारणात आता नवीन समीकरणे तयार होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामध्ये प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी, भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे आणि निखिल संतोष चौधरी या दिग्गजांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शविला असून त्याच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

दरम्यान भुसावळ व जळगावच्या विकासासाठी राजकीय शक्ती उभी करणे, शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करणे तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करणे, असा या प्रवेशामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. भुसावळ मधील गायत्री भंगाळे आणि अनिल चौधरी यांच्या प्रवेशानंतर भुसावळ मधील अनेक नगरसेवकांनीही शिवसेनेची वाट धरल्याने शिवसेनेचे प्राबल्य येथे वाढले आहे.
शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये गटनेते सचिन चौधरी, इक्बाल शेख, सुभद्रा गुंजाळ, उल्हास पगारे, अमीन कुरेशी, शेख नसीब शेख नदीम, सचिन पाटील, अकील पिंजारी, शबाना खान, पुष्पा चौधरी आणि सुनीता कृषधनकर यांचा समावेश आहे. एकंदरीत भुसावळ नगरपालिकेतील सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.











