Girish Mahajan On Madhavi Jadhav : नाशिकमधील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणामुळे निर्माण झालेला वाद वाढतच चालला आहे. मंत्री महाजन यांनी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने एका महिला वन अधिकाऱ्याने जाहीर निषेध केला, ज्यामुळे राज्यभर राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, गेल्या ४० वर्षांत मी निळा शर्ट घातला नाही असे कधी घडले आहे का?” असे स्पष्टीकरण देत समाजात फूट पाडू नये, असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले. तथापि, त्यांच्या विधानावर टीका सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
नाशिकमधील एका सरकारी कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणानंतर वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नोत्तरामुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, दोन्ही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन सरकारवाडा पोलिस ठाण्यात नेले. या कारवाईनंतर, नागरिक पोलिस ठाण्याबाहेर जमले. त्यांनी मंत्री महाजन यांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि तक्रार दाखल करण्याची मागणी केली.
गिरीश महाजन यांचे स्पष्टीकरण
वादादरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की त्यांना संपूर्ण घटनेने खूप दुःख झाले आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गाव आणि तालुकास्तरीय कार्यक्रमांमध्ये ते नियमितपणे सहभागी होतात आणि केवळ औपचारिक हार अर्पण करून परतणाऱ्या नेत्यांमध्ये ते नाहीत, असे त्यांनी सांगितले.
तक्रारी, मागण्या अन् निषेध
या घटनेनंतर माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत मंत्री महाजन यांच्याविरुद्ध अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.










