Diabetes Management Tips 2026: हल्ली मधुमेहाची समस्या अनेकांना भेडसावत आहे. आपल्या देशातील 10 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर 13 कोटी लोक मधुमेहापूर्वीच्या आजाराने ग्रस्त आहेत. अनेकांना होणारा हा अजार सामान्य वाटत असला तरी तो जीवघेणा ठरु शकतो. लोक अनेकदा मधुमेहापूर्वीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, परंतु असे करणे धोकेदायक ठरत शरीराच्या अंतर्गत अवयवांना हळूहळू नुकसान पोहोचवते. अशात मधुमेहच्या रुग्णांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहीजे. यात मधुमेहाची चाचणी करणे हा महत्त्वाचा भाग आहे. मधुमेहामुळे निर्माण होणारा हृदयविकाराचा झटका, मूत्रपिंड निकामी होणे आणि अंधत्व यासारखे गंभीर धोके टाळण्यासाठी प्रत्येक मधुमेही रुग्णाने वर्षातून किमान एकदा पाच विशेष वैद्यकीय चाचण्या केल्या पाहिजे. आजचा आपला हा लेख याच विषयावर असून जाणून घेऊया मधुमेह रुग्णांनी वर्षभरात कोणत्या चाचण्या केल्या पाहिजे.
HbA1c चाचणी
मधुमेहाच्या बाबतीतील सर्वात महत्त्वाची चाचणी म्हणजे HbA1c. ही चाचणी गेल्या 90 दिवसांतील तुमच्या सरासरी रक्तातील साखरेची माहिती देते. दररोज रक्तातील साखरेची पातळी चढ-उतार होऊ शकते, परंतु HbA1c दीर्घकालीन नियंत्रणाबद्दल अचूक डेटा प्रदान करते. जर साखरेची पातळी सातत्याने जास्त राहिली तर भविष्यात त्याचा महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होऊ शकतो.
भुकेल्या पोटी आणि जेवणानंतरच्या साखरेची चाचणी
मधुमेही रुग्णांनी भुकेल्या पोटी आणि जेवणानंतरच्या साखरेच्या चाचण्या देखील करून घ्याव्यात. या चाचणीतून भुकेल्या पोटी तुमच्या शरीराने रात्रीच्या वेळी साखरेची पातळी कशी हाताळली हे समजते. तर जेवणानंतरच्या चाचणीने शरीरातील साखरेची वाढलेली पातळी लक्षात येते. या दोन्ही चाचण्यानुसार, डॉक्टरांना औषधांचे डोस आणि आहारविषयी सुचविणे सोपे होते. ज्यामुळे अनपेक्षित गुंतागुंत टाळता येते.
डोळे आणि मूत्रपिंड तपासणी
मधुमेहाचा डोळे आणि मूत्रपिंडावर सर्वात जास्त विपरीत परिणाम होतो. अशात मूत्रपिंड कार्य चाचणी (KFT) द्वारे समस्येचे लवकर निदाण होत नुकसान टाळता येते. याव्यतिरिक्त, मधुमेह रेटिनोपॅथीचा धोका देखील जास्त असतो. म्हणूनच, डोळ्यांची तपासणी (विशेषतः रेटिनोपॅथीसाठी) अत्यंत महत्त्वाची आहे, कारण मधुमेह रेटिनोपॅथी वेदनारहित होते आणि हळूहळू दृष्टी कमी करते. नियमित तपासणीमुळे सुरुवातीच्या टप्प्यात या अवयवांना होणारे नुकसान टाळता येते.
लिपिड प्रोफाइल चाचणी
मधुमेही रुग्णांना सामान्य लोकसंख्येच्या तुलनेत हृदयविकाराचा धोका 4 पट जास्त असतो. रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्याने रक्तवाहिन्या कडक होतात आणि कोलेस्टेरॉलची पातळी बिघडते. हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी मधुमेह रुग्णांनी वर्षातून एकदा लिपिड प्रोफाइल चाचणी करणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलच्या पातळीचे लक्षात येते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )











