Chopda News: शहरातील बेघरांना घरकुल देण्यात यावे, पुर्णाकृती पुतळा, सुरळीत पाणीपुरवठा आदी मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्यावतीने चोपडा नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनानुसार, चोपडा नगर परिषद हद्दीतील बेघर व अतिक्रमणधारकांना जमिनीचे पट्टे देऊन घरकुल योजना मंजूर करावी, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जुनाट व अर्धाकृती पुतळ्यांऐवजी नवीन सुसज्ज पूर्णाकृती पुतळे उभारावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच कर्तव्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, ज्या भागांत पाणीपुरवठा अपुरा आहे, तेथे योग्य दाबाने पाणी सोडण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, अशीही मागणी करण्यात आली. निवेदनावर जळगाव जिल्हा महासचिव सचिन अशोक बाविस्कर यांच्यासह संजय पीरा अहीरे, विजय धुडपू रुपवते, अनिल गोरख वाडे, के. के. गंगावणे, वसंत वाल्हे, राहुल सिरसाट, सुकदेव कीसन बाविस्कर आदींच्या सह्या आहेत.








