Jalgaon News: जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अवैध शस्त्र तस्करीवर मोठी कारवाई केली आहे. पथकाने सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 8 गावठी पिस्टल, 10 जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा सुमारे 3 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे यश रामदास नन्नवरे (वय 27, रा. धनगर बिल्डिंग, इंडिया गॅरेजजवळ, जळगाव) याला भजी गल्ली परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत एक गावठी पिस्टल आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत या प्रकरणातील इतर आरोपींची नावे उघडकीस आली. त्यानुसार केशव सुनील भालेराव (रा. वरणगाव), गौरव देविदास साळवे (रा. पिंप्राळा, जळगाव), समाधान बळीराम निकम (रा. अंजाळे, ता. यावल), विकास प्रकाश काकडे (रा. साळसिंगो, ता. बोदवड), जगदीश गजानन महाजन (रा. बंबाळा फाटा, शाहपूर, जि. बुरहानपूर, म.प्र.) आणि कैलास राजेंद्र माळी (रा. बोरकुंड, जि. धुळे) यांना अटक करण्यात आली.
चौकशीत मुख्य आरोपी समाधान निकम हा मध्यप्रदेशातून गावठी पिस्टल आणून जिल्ह्यात विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. त्याने विविध आरोपींना पिस्टल व काडतुसे विक्री केल्याची कबुली दिली आहे. अटकेत असलेल्या आरोपींपैकी तिघांवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून समाधान निकम हा खुनाचा प्रयत्न व आर्म अॅक्टच्या गुन्ह्यातही आरोपी आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोउपनिरीक्षक गोपाल देशमुख व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास पोउपनिरीक्षक गोपाल देशमुख करीत आहेत.










