Jalgaon News: शहरातील वाढत्या उष्म्याने हैराण झालेले असतानाच एक मोठी बातमी समोर आली. शहरातील औद्योगिक वसाहतीत जे सेक्टरमध्ये शनिवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत दोन कंपन्यांना अक्षरशः जळून खाक झाल्या. या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. उष्णतेची तीव्रता, विद्युत तांत्रिक बिघाड किंवा शॉर्ट सर्किट? यापैकी एखाद्या कारणामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.
अशी घडली घटना
दुपारी सुमारे दोनच्या सुमारास ‘जे ब्रदर्स’ या कंपनीच्या गोदामातून अचानक धूर निघू लागल्याचे प्रथम लक्षात आले. काही क्षणांतच हा धूरांचे लोळ ज्वालांमध्ये परावर्तीत झाले आणि आगीने वेगाने संपूर्ण परिसर आपल्या कचाट्यात घेतला.. ‘जे ब्रदर्स’मध्ये खोबरेल तेल आणि विविध प्रकारच्या सुगंधी तेलांचे पॅकिंग केले जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ज्वलनशील पदार्थ साठवलेले होते. याच कारणामुळे आग अत्यंत वेगाने पसरली. त्याचवेळी शेजारील ‘श्री एंटरप्रायझेस’ या कंपनीत ही प्लास्टिक चटया तयार करण्याचे काम सुरू होते. प्लास्टिक आणि रसायनांचा साठा असल्याने आगीने काही मिनिटांतच या कंपनीलाही वेढले. आणि परिसरात सर्वत्र अग्नीचे लोळ दिसू लागले.
आग भडकताच परिसरात भीषण स्फोटांचे आवाज घुमू लागले. तेलाचे डबे, केमिकल्सने भरलेली पिंपे आणि प्लास्टिक साहित्य यामुळे स्फोटांची मालिका सुरू झाली. प्रत्येक स्फोटानंतर आगीच्या ज्वाला अधिक उंच उसळत होत्या. या स्फोटांमुळे आणि ज्वालांच्या प्रचंड उंचीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. जवळील कारखान्यांतील कामगारांनी तातडीने बाहेर पडून सुरक्षित अंतर राखले. काही नागरिकांनीही परिसर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. घटनेची माहिती मिळताच औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि अग्निशमन दलाची अनेक वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. आग आटोक्यात आण्याचे काम सुरू केले.






