NEET Exam 2026 Paper Leak: देशात सध्या नीट पेपरफुटीचं प्रकरण सध्या खूप गाजत आहे. या प्रकरणावर नीट पेपरफुटी समोर आणणारे राजस्थानातील शिक्षक शशिकांत सुथार यांनी मोठी माहिती दिली आहे. त्यांनी या प्रकरणाचा सर्व घटनाक्रम सांगितला आहे. पेपरफुटी लक्षात कशी आली त्याची माहिती त्यांनी दिली. त्यानुसार, सुथार यांनी 3 मे या दिवशी पेपर संपल्यावर संपूर्ण प्रश्नपत्रिका चाळली, त्याचवेळी त्यांच्या घरमालकाने त्यांना रसायनशास्त्राची एक पीडीएफ दाखवली, त्यातील प्रश्न आणि प्रश्नपत्रिकेतील 45 प्रश्न समान असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. असाच प्रकार काहीवेळाने जीवशास्त्राच्या पेपरबाबतही झाल्याचं दिसलं, जीवशास्त्राचे 90 प्रश्न समान होते, असं शशिकांत सुथार म्हणाले.
हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर शशिकांत सुथार यांनी यंत्रणांना ही माहिती दिली. एनटीए, सीबीआय, शिक्षण मंत्रालय यांना मेलद्वारे ही माहिती दिली आणि त्यानुसार सरकारने लगेच कारवाई सुरु केली, असं शशिकांत सुथार यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. याचदरम्यान, मनीषा मांढरेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत आहेत. मनीषा मांढरेची स्वत:ची स्मरणशक्ती चांगली होती. त्यामुळे याच स्मरणशक्तीचा मनीषा मांढरेने उपयोग केला. मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ होते. मनीषा मांढरेने कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. मनीषा मांढरेनेच्या या ट्रिकने सीबीआयही च्रकावली. दरम्यान, नीट पेपेरफुटीतील अन्य आरोपी मनीषा वाघमारे हिने चौकशीत मनीषा मांढरेचं नाव घेतलं आहे. त्यानंतर सीबीआयने मनीषा मांढरेला अटक केली होती. मनीषा मांढरेविरोधात अन्य कोणताही ठोस पुरावा मिळाला नव्हता. पेपरमधील सर्व प्रश्न डोक्यात ठेवून मनीषा मांढरेने विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्न पोहोचवले.
नीटच्या पेपर फुटीचा कट शिवराज मोटेगावकरने त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. त्यासाठी मोटेगावकरने सर्वात आधी त्याच्या क्लासमधे काम करणाऱ्या पीव्ही कुलकर्णीची एनटीएच्या प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या पॅनलवर वर्णी लावून घेतली. सोबत मनीषा मांढरे हीची देखील NTA च्या पॅनलवर वर्णी लावण्यात आली. कुलकर्णी केमिस्ट्री आणि मांढरे बायॉलॉजीच्या प्रश्नपत्रिका फोडणार आणि त्या मोटेगावकरपर्यंत पोहोच करणार अशी सोय करण्यात आली. वर्षानुवर्षे अध्यापनाचे काम केल्याने पीव्ही कुलकर्णीने केमिस्ट्रीच्या तर मनीषा मांढरेने बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न तोंडपाठ केले. NTA मध्ये प्रश्नपत्रिका तयार करतानाच त्यांनी त्या प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न तोंडपाठ केले. त्यानंतर ते हाताने लिहून काढून मोटेगावकरला पाठवले. मोटेगावकरने ते पीडीएफच्या स्वरुपात स्वत:च्या मोबाईलमधे सेव्ह करुन ठेवले आणि पुढे पैशांच्या बदल्यात त्यांची विक्री केली. 3 मे रोजी परिक्षा पार पडल्यावर मोटेगावकरने मोबाईलमधून ते डिलीट करुन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र सीबीआयने मोबाईलमधील डेटा रिकव्हर केला आणि मोटेगावकरला अटक झाली.









