Bhusawal News: मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने प्रवाशांच्या सुरक्षेसह त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाबाबतची आपली बांधिलकी पुन्हा सिद्ध केली आहे. प्रशासनाने ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत एक प्रशंसनीय कार्य करत सुमारे 51 हजार रुपये किमतीचा हरवलेले सामान सुरक्षितपणे शोधून त्याच्या खऱ्या मालकाकडे सुपूर्द केले.
याबाबत माहिती अशी की, दि. 15 जून 2026 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर कर्तव्य बजावत असताना सहाय्यक उपनिरीक्षक (ASI) दीपक कव्हले यांना एका प्रवाशाने बेवारस अवस्थेत आढळलेली काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग सुपूर्द केली. सदर बॅग नियमानुसार आरपीएफ ठाण्यात आणून सीसीटीव्ही निगराणीखाली तपासण्यात आली. तपासणीदरम्यान त्यामध्ये HP कंपनीचा लॅपटॉप, Fossil कंपनीचे घड्याळ, पॉवर बँक तसेच इतर साहित्य आढळून आले.

काही वेळानंतर शुभम प्रमोदकुमार हरकूट (वय 32 वर्षे), रा. जयराम नगर, अमरावती हे आरपीएफ ठाण्यात उपस्थित झाले व त्यांनी प्रवासादरम्यान गाडी क्रमांक 13425 डाउनने भुसावळ येथून अमरावतीकडे जात असताना त्यांची काळ्या रंगाची लॅपटॉप बॅग प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर राहून गेल्याची माहिती दिली. त्यांनी बॅगेतील साहित्याचे अचूक वर्णन केले. त्यामध्ये सुमारे 30,000 रुपये किमतीचा HP लॅपटॉप, 20,000 रुपये किमतीचे Fossil घड्याळ, एक पॉवर बँक आणि दोन चार्जर्स यांचा समावेश होता.
एएसआय दीपक कव्हले यांनी प्रवाशाच्या निवेदनाची तसेच ओळखीसंबंधी तपशीलांची पडताळणी केल्यानंतर जप्त करण्यात आलेले सामान त्याच्या खऱ्या मालकाकडे सुरक्षितपणे सुपूर्द केले. आपले मौल्यवान सामान परत मिळाल्याने संबंधित प्रवाशाने रेल्वे सुरक्षा बल तसेच मध्य रेल्वेचे मनःपूर्वक आभार मानले.
मध्य रेल्वे भुसावळ विभागाचे रेल्वे सुरक्षा बल ‘ऑपरेशन अमानत’च्या माध्यमातून प्रवाशांच्या हरवलेल्या वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्यरत असून प्रवाशांची सुरक्षा व सुविधा सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे.






