Parola News: पारोळा तालुक्यातील सबगव्हाण टोल नाक्याजवळ शनिवारी रात्री साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात होऊन केमिकलने भरलेल्या टँकरने उभ्या असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर केमिकल टँकरला भीषण आग लागून वाहन चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आग आटोक्यात आणली.
चालकाचा होरपळून मृत्यू
प्राथमिक माहितीनुसार, सबगव्हाण टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी एक टँकर उभा होता. त्याचवेळी धुळेहून पारोळ्याकडे भरधाव वेगाने येणारा केमिकलने भरलेला (जीजे-१८-बीव्ही-८३१५) क्रमांकाचा टँकर अचानक टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकरने समोर उभ्या असलेल्या टँकरला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर केमिकल टँकरच्या पुढील भागाने तात्काळ पेट घेतला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने चालकाला बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही आणि तो टँकरमध्येच जळून मृत्युमुखी पडला.

अग्निशमन दलाची तत्परता
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील, तहसीलदार डॉ. उल्हास देवरे, शहर महसूल अधिकारी निशिकांत माने, गोपनीय विभागाचे महेश पाटील, भूषण पाटील तसेच पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. या भीषण अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मृत चालकाची ओळख पटविण्याचे तसेच अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.










