Dharangaon News: दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण अभ्यासक सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला देशभरातून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर धरणगावातही महाविकास आघाडीच्या वतीने सरकारच्या कथित दडपशाहीविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ झालेल्या या आंदोलनात केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, परीक्षांमधील पारदर्शकता अबाधित राहावी आणि लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा सन्मान राखावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
सोनम वांगचुक यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सलग अनेक दिवस शांततापूर्ण पद्धतीने उपोषण करून देशातील परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी, विशेषतः (NEET) नीट पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, जबाबदारी निश्चित करणे आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित करणे या मागण्यांवर भर दिला होता. या आंदोलनाला देशभरातून वाढता प्रतिसाद मिळत असताना प्रशासनाने आंदोलनावर केलेल्या कारवाईचा निषेध व्यक्त करत धरणगावात महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे, केंद्रीय व राज्य शिक्षणमत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार थांबवा, लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबू नका. अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उपस्थितांनी हातात विविध मागण्यांचे फलक घेत सरकारच्या धोरणांवर टीका केली.

आंदोलनादरम्यान गुलाबराव वाघ, प्रा. एन.डी. पाटील, कल्पिता पाटील, संजय पाटील, सुनील सोनार यांच्यासह विविध वक्त्यांनी आपली मते मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने गंभीरपणे विचार करावा, परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेना (उबाठा) उपनेते गुलाबराव वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सोनम वांगचुक हे पर्यावरण, शिक्षण, देशाच्या सैनिकांसाठी आणि समाजहिताच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे व्यक्तिमत्त्व आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या व्यक्तीचा आवाज दडपणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. सरकारने विरोधकांचा आवाज दडपण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, असे वाघ म्हणाले.
यावेळी नीट (NEET) आणि टेट (TET) संदर्भातील प्रकरणांमध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून संबंधित शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने पुढील काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. आंदोलनानंतर विविध मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक उमाकांत गायकवाड यांच्याकडे महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सुपूर्द केले.
या आंदोलनात शिवसेना (उबाठा) उपनेते व रावेर लोकसभा तसेच नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रा. एन. डी. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख महेंद्र महाजन, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, नगरसेवक लक्ष्मण महाजन, परमेश्वर महाजन, सुनील भाऊ चौधरी, उपशहरप्रमुख किरण अग्निहोत्री, युवा सेनेचे उपजिल्हा संघटक विनोद रोकडे, कार्याध्यक्ष हितेंद्र पाटील, शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, शहर कार्याध्यक्ष रविंद्र वाघ, युवक जिल्हा कार्याध्यक्ष मोहित पवार, युवक तालुकाध्यक्ष परेश गुजर, युवक शहराध्यक्ष जुनेद बागवान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलीम मिस्तरी, महेश पवार, दिनेश रंगराव पाटील, ताराचंद दादा, विजय जनकवार, सुनील सोनार, भूषण भागवत, गौरव चव्हाण, योगेश येवले, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









