Nashik/ Bhusawal News: शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी किफायतशीर व विश्वासार्ह रेल्वे वाहतुकीचे प्रभावी माध्यम ठरलेल्या देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी विशेष रेल्वेने आपली शंभरावी फेरी पूर्ण केली. आतापर्यंत या सेवेद्वारे एकूण १४,०७०.१० टन पार्सल मालाची वाहतूक करण्यात आली आहे. यात कृषी उत्पादनासह इतर मालाचा समावेश आहे.
दरम्यान यामध्ये ५,४७२.५० टन नाशवंत वस्तू आणि ८,५९५.६१ टन पार्सल यांचा समावेश आहे. या कालावधीत पार्सल वाहतुकीतून सुमारे पाच कोटी १४ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. या सेवेतून आतापर्यंत ४६,७२७ प्रवाशांनी प्रवास केला असून, त्यातून सुमारे सव्वा कोटी महसूल मिळाले. या गाडीमुळे एकूण सुमारे साडे सहा कोटी महसूल प्राप्त झाला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागासाठी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी म्हणून ही रेल्वे ओळखली जाते. शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना कृषी उत्पादने तसेच इतर माल देशातील विविध बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी किफायतशीर, विश्वासार्ह आणि सुलभ रेल्वे वाहतूक या गाडीमुळे उपलब्ध झाली आहे.
या रेल्वे सेवेचा शुभारंभ रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. ही रेल्वे दर शनिवारी देवळाली ते दानापूर दरम्यान धावते. या रेल्वेला दहा पार्सल व्हॅन आणि दहा सामान्य श्रेणीचे डबे आहेत. प्रत्येक पार्सल व्हॅनची क्षमता २३ टन आहे.
कृषी व इतर वाहतूक
शेतकरी समृद्धी विशेष रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर कृषी उत्पादने आणि इतर वस्तूंची वाहतूक करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने—
– डाळिंब –१,४७.१२ टन
– कांदा –१,६५०.६९ टन
– सीताफळ – २५९.३५ टन
– आले – २०१.९१ टन
– द्राक्षे – १२९.८५ टन
– लिंबू – ११९.०६ टन
– बिस्किट/चॉकलेट/कँडी – ६३५३.२४ टन
– हग्गीज – ५७४.४० टन
– व्हीआयपी बॅग – ४५६.९६ टन
– प्लास्टिक बॅग – ५६९.५३ टन
– प्लास्टिक मॅट – ५१९.८५ टन
– कापड – १९४.४८ टन
– खाद्य उत्पादने – १८७.५७ टन
– औषधे – ९२.६० टन
याशिवाय आइस फिश, भेंडी, विडा पाने, पेरू, शेवगा, कोथिंबीर, खरबूज, फुलकोबी, संत्री, आंबे, बीन्स, बोर, गाजर, मिश्रित फळे, अंडी यांसह विविध प्रकारच्या इतर नाशवंत वस्तूंचीही वाहतूक करण्यात आली आहे.
देवळाली- दानापूर शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सेवेने नाशिक परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांना आपली कृषी उत्पादने तसेच इतर वस्तू दूरवरच्या बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यासाठी किफायतशीर, विश्वासार्ह आणि प्रभावी रेल्वे-आधारित लॉजिस्टिक्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यामुळे कृषी उत्पादने वेळेत आणि व्यापक बाजारपेठांपर्यंत पोहोचविण्यास मदत होत आहे.
मध्य रेल्वे, भुसावळ विभाग शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि प्रवाशांसाठी पार्सल तसेच कृषी लॉजिस्टिक्स सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी आणि अधिक चांगल्या व प्रभावी वाहतूक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे.










