K9 Vajra Howitzer Purchase: भारताने आपली लष्करी शक्ती मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या दुहेरी आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कर 300 हून अधिक के-9 वज्र स्वयंचलित हॉवित्झर तोफा खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यासाठी अंदाजे 23,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला लवकरच संरक्षण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी सादर केला जाण्याची शक्यता आहे.
सूत्रांनुसार, हा प्रस्ताव या आठवड्यात संरक्षण खरेदी मंडळासमोर सादर केला जाण्याची शक्यता आहे. संरक्षण मंत्रालयाने मंजुरी दिल्यास, लार्सन अँड टुब्रो (L&T) या तोफांच्या निर्मितीसाठी जबाबदार असेल. भारताच्या संरक्षण इतिहासातील हा सर्वात मोठ्या तोफखाना कार्यक्रमांपैकी एक मानला जातो.

भारतात होणार निर्मिती
एल अँड टी (L&T) दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हनव्हा एरोस्पेससोबत तांत्रिक भागीदारी करून भारतात के-9 वज्र तोफेची निर्मिती करत आहे. या नवीन ऑर्डरमुळे, भारतीय सैन्यातील सेवेत असलेल्या आणि ऑर्डरवर असलेल्या के-9 वज्र तोफांची एकूण संख्या 500 पेक्षा जास्त होईल. एवढ्या मोठ्या संख्येने आधुनिक स्वयंचलित तोफांच्या तैनातीमुळे भारतीय तोफखान्याच्या मारक क्षमतेत लक्षणीय वाढ होईल.
या पुर्वी भारताने 2017 मध्ये अंदाजे 4,500 कोटी रुपयांना 100 के-9 वज्र तोफांची पहिली ऑर्डर दिली होती. सुरुवातीला त्या राजस्थान आणि गुजरातच्या वाळवंटी प्रदेशात तैनात करण्यात आल्या होत्या. यानंतर डिसेंबर 2023 मध्ये 100 तोफांची ऑर्डर देण्यात आली.
काय आहे ‘या’ तोफांचे वैशिष्ट्ये
के-9 वज्र ही 155 मिमी/52 कॅलिबरची स्वयंचलित हॉवित्झर तोफ आहे. ही तोफ 40 किलोमीटरहून अधिक अंतरावर अचूक मारा करण्यास सक्षम आहे. ही तोफ वाळवंटापासून ते बर्फाच्छादित पर्वतांपर्यंत प्रभावी काम करते. के-9 वज्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची ‘शूट अँड स्कूट’ क्षमता. याचा अर्थ असा की, एक क्षेपणास्त्र डागल्यानंतर ती स्वतःला त्वरीत पुन्हा योग्य स्थितीत आणू शकते, ज्यामुळे शत्रूला लक्ष्य करणे कठीण होते. या तोफांमुळे चीन आणि पाकिस्तान या दोन्ही सीमांवर लष्कराची ताकद वाढेल. आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या तोफा भविष्यातील कोणत्याही आव्हानाला जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.










