Nashik News: नाशिक जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तश्रृंगी देवीच्या गडावर नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची मोठ्या संख्यनं गर्दी होत आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता सप्तश्रृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी येथे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्याच ठिकाणी बंदोबस्तला असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर एका भरधाव कार येऊन जोरदार धडकली. या भीषण अपघातात ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक पोलीस एका उपनिरीक्षकाचा मृत्यू झाला. तसेच ११ हुन अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि काही भाविक देखील या अपघातात गंभीर झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची सध्या मोठी रीघ लागली आहे. रात्री देखील दर्शनासाठी मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. याच दरम्यान नांदुरी येथील मुख्य रस्त्यावर १८ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या कारने भाविक आणि बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांना जबर धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

तसेच या अपघातात वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय गायकवाड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ते कर्तव्य बजावताना शहीद झाले आहेत. त्यांच्या निधनामुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात घडल्यानंतर कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. मात्र, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे नांदुरी परिसरात खळबळ उडाली.
जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार
दरम्यान या अपघातातील ११ जखमी भाविक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असून काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. अधिक तपास वणी पोलीस करत आहेत.









