Dharangaon News: जिल्ह्यातील धरणगाव बस स्थानक परिसरात बुधवारी सकाळी सायबर सुरक्षा जनजागृती विषयावर विशेष इम्पॅक्ट सेशन व इम्पॅक्ट ॲक्टिव्हिटी आयोजित करण्यात आली होती. तज्ज्ञांकडून ऑनलाईन फसवणूक अन् सोशल मीडियाचा सुरक्षित वापराबाबत या सत्रामध्ये प्रियदर्शनी भांडारकर व खुशबू लांबोळे यांनी उपस्थितांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या उपक्रमात ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, विशिंग, स्मिशिंग, ओटीपी व पासवर्ड सुरक्षितता, मजबूत पासवर्ड तयार करण्याचे महत्त्व, द्विस्तरीय प्रमाणीकरण (2-Factor Authentication), सोशल मीडियाचा सुरक्षित वापर, बनावट लिंक व क्यूआर कोड स्कॅमपासून सावध राहणे, सायबर बुलिंग, डिजिटल गोपनीयता, अज्ञात व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क टाळणे, मोबाईल ॲप्स डाउनलोड करताना घ्यावयाची सुरक्षा काळजी तसेच सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

संवादात्मक व प्रभावी पद्धतीने घेण्यात आलेल्या या इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीला उपस्थितांचा चांगला प्रतिसाद लाभला. सहभागी व्यक्तींनी विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत माहिती जाणून घेतली. तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहण्याचा आणि सुरक्षित डिजिटल जीवनशैलीचा अवलंब करण्याचा संकल्प केला.
या मार्गदर्शन व चर्चासत्रासाठी धरणगाव येथील ए.सी.एस. आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज येथील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच या इम्पॅक्ट सेशन व ॲक्टिव्हिटीसाठी बस स्टँड, येथील उपक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने सर्वांचे आभार सायबर तज्ज्ञ प्रियदर्शनी भांडारकर यांनी मानले.









