Jalgaon News: जळगाव शहर आणि भुसावळ परिसरात दुहेरी हत्याकांडाचा मोठा कट जळगाव पोलिसांनी उधळून लावला असून त्यामुळे शहरातील संभाव्य गॅंगवॉर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळले आहे. भुसावळ येथील सराईत गुन्हेगारांचा खून करणे आणि लुटण्याच्या इराद्याने जळगावात आलेल्या ५ अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची सुपारी देण्यात आल्याची माहिती तपासात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या कारवाईत चार गावठी कट्टे, नऊ जिवंत काडतुसे, धारदार शस्त्रे, एमडी ड्रग्जसह सुंमारे ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ येथील मिथुन बारसे आणि क्रिश बारसे हे जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात एका कार्यक्रमासाठी रविवारी मध्यरात्री आले होते. त्यांच्यावर हल्ला करून हत्या करणे आणि त्यांच्या अंगावरील सोने लुटण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांना या घटनेचा सुगावा लागल्याने त्यांनी हा कट उधळ्याचे सांगितले.
घटना अशी
गुन्हे शोध पथकाला गोपनीय बातमी मिळाली होती, त्यानुसार पिंप्राळा परिसरातील भवानीमाता मंदिर ते सिल्कमिलसमोरील मोकळ्या जागेत सापळा रचण्यात आला. यावेळी रामानंद पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने इनोव्हा कारवर छापा टाकून कारमध्ये बसलेल्या राणू उर्फ ओमकार भदरगे (रा. शास्त्रीनगर, ठाणे), खुशाल गजानन बोरसे (रा. खडकारोड, भुसावळ), संदीप बबन लोढे (रा. वाघनगर, जळगाव), अरविंद विजय कांबळे (रा. कासोळा, जि. वाशिम) आणि सोनू महेंद्र जयस्वाल (रा. सातिवली, वसई, जि. पालघर) या पाच जणांना ताब्यात घेतले. यावेळी केलेल्या कारवाईत चार गावठी कट्टे, काडतुसे, मिरची पावडर, दोऱ्या, मास्क, पाच मोबाईल फोन आणि इनोव्हा कार असा एकूण नऊ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गॅंगवॉर रोखला
दरम्यान या घटनेने जळगाव सह भुसावळ शहरात गॅंगवॉर सुरू झाला असता मात्र, वेळीच आरोपींच्या मुसक्या आवळ्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणी अधिक तपास केला असता त्यात भुसावळ येथील दुहेरी हत्याकांडात फरार असलेले बंटी पथरोड आणि शिव पथरोड यांनी मिथुन बारसे, क्रिश बारसे आणि करण यांची हत्या करण्यासाठी ३५ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले आहे असे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी मारेकऱ्यांना पाच लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या कटामागील मुख्य सूत्रधार हा अभिषेक गोयर, बंटी पथरोड, शिव पथरोड तर मध्यस्थ म्हणून रवी होळकर यांची नावे पुढे आली आहे. पोलिसांनी या चौघांचीही आरोपी म्हणून गुन्ह्यात वाढ केली आहे.केमिस्ट्री शिका
गंभीर कलमे लावली
या प्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य, आरोपींचा सहभाग तसेच घरझडतीत आढळलेली शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थ लक्षात घेऊन भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३१०(४), ३१०(५), ६१(२), हत्यार कायदा कलम ३/२५ व ४/२५ तसेच एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २२(क) या वाढीव कलमांची नोंद करण्यात आली आहे. या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप असलेले बंटी पथरोड, शिव पथरोड, अभिषेक गोयर आणि मध्यस्थ रवी होळकर यांचीही आरोपी म्हणून गुन्ह्यात वाढ करण्यात आली आहे.
सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेल्या तसेच फरार आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी गंभीर असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. संबंधित आरोपींविरुद्ध यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चोरी आणि हत्यार कायद्यांतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. मुख्य सूत्रधार बंटी पथरोड याच्याविरुद्ध १९, तर शिव पथरोड याच्याविरुद्ध १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, दीपक जगदाळे, संतोष पवार, जितेंद्र वल्टे, सहायक पोलीस निरीक्षक अंकुश वारुंगसे यांच्यासह रामानंद नगर पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.









