Jalgaon News: युनायटेड फोरम ऑफ बॅँक युनियन्स (यूएफबीयू), सहभागी बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांचे प्रतिनिधित्व करणारे संयुक्त व्यासपीठ, बॅँक कर्मचारी व बँकिंग क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या प्रलंबित प्रश्नांच्या निराकरणासाठी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक देत पाच दिवसांचा आठवडा लागू करा,यासह विविध मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला.
‘यूएफबीयू’च्या प्रमुख मागण्या
पूर्वी झालेल्या आयबीए आणि यूएफबीयू यांच्यातील द्विपक्षीय करार, समझोत्यामध्ये मान्य करण्यात आलेल्या पाच दिवसांच्या बँकिंगची अंमलबजावणी करावी, पीएलआय योजनेचा युनियनसोबत द्विपक्षीय चर्चेद्वारे पुनर्विचार, सुधारणा करावी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करावे, सर्व प्रलंबित व अवशिष्ट प्रश्नांवर यूएफबीयू सोबत अर्थपूर्ण, सकारात्मक आणि कालबद्ध चर्चा करून त्यांचे निराकरण करावे आदी मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय देशव्यापी संपात सहभागी होऊन जळगाव येथील स्टेट बँकेच्या आवारात शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करण्यात आली.
जळगावमधील विविध बँक पदाधिकाऱ्यांचा सहभाग
या संपाच्या अनुषंगाने जळगाव येथे विविध बँकांतील युनियन पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. यात एसबीआयचे कॉम्रेड प्रसाद पाटील, मिलींद पाटील, धीरज भगत, राधेश्याम मुंगमोडे, पंजाब नॅशनल बँकेचे धीरज वर्मा, श्याम चौधरी, बँक ऑफ इंडियाचे किशोर वर्मा, सेंट्रल बँकेचे भरत जाधव, बँक ऑफ महाराष्ट्राचे मोहन खेनवलकर, बीओबीचे कॉम्रेड निलेश शिपलकर यांच्यासह बँक कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बँकिंग सेवांवर परिणाम
या संपामध्ये सहभागी होणाऱ्या शाखा व कार्यालयांमध्ये नियमित बँकिंग कामकाजावर परिणाम होऊन रोख रक्कम जमा करणे, काढणे, क्लिअरिंगशी संबंधित कामकाज, सेफ डिपॉझिट, लॉकर सेवा आणि इतर शाखास्तरीय व्यवहार, डिजिटल व इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवा आदीवर परिणाम झाला होता. डिजिटल व इलेक्ट्रॉनिक बँकिंग सेवामुळे आता बँकिंग व्यवहार पूर्णपणे बंद राहत नाही व त्यामुळे पाच दिवसीय बँकिंग आठवडा करण्यास काहीही हरकत नाही हे नमूद करत यूएफबीयू व आयबीए यांच्यामध्ये या विषयावर आधीच अग्रीमेंट झालेले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी फक्त बाकी आहे.

‘यूएफबीयू’चे आवाहन
वित्तीय सेवा विभाग आणि भारत सरकार यांनी यूएफबीयूच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन इंडियन बँक्स असोसिएशन व युनियनसोबत तातडीने अर्थपूर्ण चर्चा घडवून आणावी आणि प्रलंबित प्रश्नांचा समाधानकारक तोडगा काढावा, असे आवाहन यूएफबीयूने केले आहे. या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आणि प्रलंबित प्रश्नांचे निराकरण न झाल्यास, संपाच्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या कार्यक्रमानुसार प्रस्तावित संप करण्यात येईल, असे यूएफबीयूने स्पष्ट केले आहे.
..तर २८ सप्टेंबरपासून संपाचा इशारा
युनायटेड फॉर्म ऑफ बैंक युनियनने हे स्पष्ट केलेले आहे की मागण्या वेळेत मान्य न झाल्यास येत्या दि. २८ सप्टेंबर तारखेपासून दि. ३० सप्टेंबरपर्यंत देखील बँक युनियन आणि बँक कर्मचारी संपावर राहतील, असा इशारा यूएफबीयूने दिला आहे.









