Chhatrapti Sambhajinagar: घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला सर्वत्र तयारी सुरू असतांना मोठी घटना समोर आली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर कचनेर फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे .या अपघातात तीन तरुण भाविकांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे तीनही भाविक तुळजाभवानीची ज्योत आणण्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातानंतर चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
सध्या नवरात्रोत्सवाचा काळ असून त्यानिमित्त तुळजाभवानी मातेची ज्योत घेऊन परतणाऱ्या तीन तरुण भाविकांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील कचनेर फाट्याजवळ रात्रीच्या सुमारास भरधाव आयशर ट्रकने दुचाकीला जोराची धडक देऊन आयशर ट्रकने दुचाकीला तीन किलोमीटरपर्यंत फरफटत नेले. या अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला.
दरम्यान धडक इतकी भयानक होती की दुचाकी थेट खाली जाऊन अडकली, तरी ट्रक चालक थांबला नाही दुचाकीला सुमारे तीन किलोमीटरपर्यंत फरफटत घेऊन गेला. त्या भीषण अपघातात अक्षय राजपूत याचा जागीच मृत्यू झाला, अमोल औटे आणि गोरख म्हसकर या दोघा तरुणांना घाटी रुग्णालयात नेल्यावर उपचार सुरू असतांना त्यांची प्राण ज्योत मालवली. तर शुभम अधाने हा युवक गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू असून सर्व तरुण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान खुलताबाद तालुक्यातील जाफराबादवाडी-गोळेगाव या भागातील काही तरुण दरवर्षी मोठ्या श्रद्धने तुळजापूर येथून देवीची ज्योत घेऊन पायी आपल्या गावाकडे प्रवास करतात. या दरम्यान पदयात्रा करत येणाऱ्या या भाविकांना मदतीला काही युवक सोबत होते, ते मदत व्हावी म्हणून दुचाकीवरून त्यांच्या सोबत चालले होते. याच दरम्यान मागून आलेल्या एका सुसाट कंटेनरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.








