Puntaba News: पुणतांबा (Puntamba) येथील:दुष्काळ आणि शेतकऱ्याची अडचणी पाहता दिनांक 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती (Gandhi Jaynti) सरकारी सुट्टी असूनही पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालय सुरू होते. आजच्या दिवशीही कृषी सहाय्यक वैशाली पुंड (Vaishali Punda) आणि ग्रामपंचायत कर्मचारी कर्तव्यावर हजर असल्याचे चित्र शेतकरी वर्गासाठी आश्चर्याचे आणि धक्का देणारे व तितकेच दिलासा देणारे होते. कृषी सहाय्यक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी दाखवलेला संवेदनशीलपणा शेतकऱ्यांना समाधान देऊन गेला.
१४ तालुके दुष्काळग्रस्त
अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील चौदा तालुके दुष्काळ ग्रस्त म्हणून जाहीर झाले, पीकपहाणी, दुष्काळाचे पंचनामे,तसेच नुकसानग्रस्त शेतकरी कागदपत्रे जमा करण्याचा अवधी हा कमी दिवसाचा असल्याने तसेच इंटरनेट, सर्व्हर, वीज अशा तांत्रिक अडचणी लक्षात घेता आज शेतकऱ्याबरोबरच अधिकारी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

त्यात सरकारी सुट्ट्या, आठवड्याच्या सुट्ट्या पाहता आपले काम रखडून शेतकऱ्याची दिवाळी गोड व्हावी म्हणून, आज गांधी जयंतीची सरकारी सुट्टी असूनही राहाता तालुका कृषी विभागाचे पुणतांबा व रामपूरवाडी या गावचे कृषी सहाय्यक वैशाली पुंड, किरण धुमाळ आज पुणतांबा ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून शेतकऱ्याची कागदपत्रे तपासून काही त्रुटी राहणार नाही, याची काळजी घेतांना दिसले.
शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान
दुष्काळाचे सावट असतानाही पुणतांबा कार्यालयात ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी सहाय्यक यांना पाहताच बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. कृषी सहाय्यक यांच्यासह पुणतांबा ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब मातंग, सरपंच स्वाती पवार, ग्रामपंचायत कर्मचारी कुमार हासे, धनंजय गुंजाळ, सतीश जोगदंड, मुमताज शेख, संतोष जोगदंड, सुनीता धनवटे, अनिल धनवटे हे सर्व सुट्टी असूनही आज ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहून ग्रामस्थांची कामे मार्गी लावत होते.
सरकारी मदत लवकर मिळावी: पुंड
दुष्काळाच्या रूपाने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे. या संकटात त्यांना झालेल्या नुकसानीची सरकारी मदत लवकर मिळावी आणि त्याची दिवाळी गोड व्हावी म्हणून आज गांधी जयंतीची सुट्टी असतानाही काम करण्याचा निर्णय घेतला आहे. असे पुणतांबा कृषी सहाय्यक वैशाली पुंड यांनी सांगितले.
मला आश्चर्य वाटले: शेतकरी
मी पिंपळवाडी येथील रहिवासी असून माझी जमीन पुणतांबा शिवारात आहे. काल कृषी सहाय्यक पुंड यांचा सोशल मीडियावर मेसेज मिळाला.पण गांधी जयंतीची सुट्टी असेल आणि अधिकारी कशाला येतील असे वाटले. तरी, ग्रामपंचायत कार्यालयात आपली कागदपत्रे जमा करावी म्हणून आलो.प्रत्यक्षात ग्रामपंचात कार्यालय उघडे आणि कृषी सहाय्यक हजर असल्याचे पाहून मला आश्चर्य वाटले, असे शेतकरी धरम शेखर यांनी सांगितले.
समाधानाची बाब: शेतकरी
बँक,तलाठी कार्यालय,पोस्ट ऑफिस हे आज बंद आहेत पण पुणतांबा ग्रामपंचायत कर्मचारी,कृषी अधिकारी यांना काम करताना पाहून आनंद वाटला आणि आश्चर्य वाटले. असे पुणतांब्याचे शेतकरी नारायण पऱ्हे यांनी सांगितले.









