Raigad News : रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रायगडच्या दिवेआगारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. समुद्रात पोहोण्यासाठी उतरलेले 8 विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. मयत सर्वजण पुण्यातील आळंदी येथून सहलीसाठी आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने आठही जण पाण्यात बुडाल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत माहिती अशी की, पुण्यातील आळंदी येथून एका खासगी क्लासची सहल पर्यटनासाठी आली होती. त्यातील 8 जण समुद्रकिनारी पाण्यात पोहोण्याचा आनंद घेत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेतील सर्व आठही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मयत विद्यार्थी दिवे आगार येथे विनर्स अकॅडमीत शिक्षण घेत होते. ही खाजगी शिकवणी असून ते सर्वजण अकरावीचं शिक्षण घेत होते. 42 विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे 44 जण आज दिवे आगारला ट्रिपसाठी गेले होते. त्यातील आठ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी मृतदेह बाहेर काढण्यासाठी मदत केली, तसेच स्थानिक नागरिकांनीही सहकार्य केले. मात्र, या दु्र्घटनेनं समुद्रकिनारी शोककळा पसरली आहे. दुर्घटनेतील सर्व मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.










