किशोर शिंपी
Jalgaon News: जळगाव शहराबाहेरून गेलेल्या मुंबई-नागपूर महामार्ग क्रमांक ६ वरील तरसोदजवळील रेल्वे पुलाचा पावसामुळे भराव ढासळला आणि त्याचा थेट फटका जळगावकरांच्या वाहतुकीला बसला. महामार्गावरील वाहतूक शहरातून वळविण्यात आली असताना शहरातील दोन रस्त्यांवर सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक समांतर रस्त्यांवर ढकलण्यात आली आहे. मात्र, या समांतर रस्त्यांची अवस्था पाहता ‘रस्ता वाहतुकीसाठी की वाहनांच्या दुकानांसाठी? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
खोटे नगर ते मानराज पार्क या मार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा भार समांतर रस्त्यावर आला आहे. आधीच या रस्त्यावर जुन्या वाहनांची विक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी रस्त्यालगतच आपले बस्तान मांडले आहे. विक्रीसाठी उभी केलेली वाहने, ग्राहकांची वाहने आणि त्यात भर पडलेली वळविण्यात आलेली वाहतूक यामुळे रस्त्याची अक्षरशः कोंडी झाली आहे.
हॉटेलसमोर रस्ता की पार्किंग?
गुजराल पेट्रोल पंपाच्या पुढे असलेल्या बिअर बारपासून पुढे श्रुंगार आणि हॉटेल कस्तुराज परिसरात सायंकाळी ग्राहकांची मोठी गर्दी होते. हॉटेलमध्ये जाणाऱ्या ग्राहकांकडून रस्त्यावरच वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी अधिकच वाढते. एकीकडे रस्ता अरुंद, दुसरीकडे बेशिस्त पार्किग आणि त्यावरून जाणाऱ्या वाहतूकीमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोंडीत अडकलेल्या वाहनचालकांचा संयम सुटत असून, ‘तुमचे वाहन बाजूला घ्या’पासून सुरू होणारे वाद थेट शाब्दिक चकमकीपर्यंत पोहोचत आहेत. एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का, असा सवालही उपस्थित होत आहे.
महापालिकेने आता ‘बघ्याची भूमिका’ सोडावी!
सध्या महामार्गावरील वाहतूक शहरात आल्याने परिस्थिती अधिक गंभीर आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने समांतर रस्त्यावरील बेकायदा पार्किंग तातडीने हटवावी. रस्त्यालगत उभी केलेली जुन्या वाहनांची दुकाने हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा, तसेच हॉटेल-बार परिसरातील पार्किंगला शिस्त लावावी, अशी मागणी शहरवासीयांकडून होत आहे.









