Jalgaon News: जिल्ह्यातील जामनेर औद्योगिक वसाहतीत आघाडीची कोका-कोला कंपनी नवीन उत्पादन प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या उपाध्यक्षांसह वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने जामनेर एमआयडीसी परिसराला भेट देऊन प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जागेची पाहणी केली. या प्रकल्पासाठी भविष्यात वापरल्या जाणार्या पाण्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोका-कोला प्रकल्पाला विरोध करणार्यांना थेट प्रत्युत्तर दिले.
जामनेर औद्योगिक वसाहतीत सुमारे 1700 एकर क्षेत्रावर एमआयडीसी विकसित होत आहेत. कोका-कोला प्रकल्प जामनेरमध्ये साकारल्यानंतर अन्य कंपन्यांनाही या परिसरात उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रस्तावित कोका-कोला प्रकल्पासाठी वाघूर धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जाणार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या पाण्याचा औद्योगिक वापर झाल्यास शेतीसाठी उपलब्ध पाण्यावर परिणाम होऊन शेतकर्यांवर अन्याय होऊ शकतो, अशी भूमिका काहींनी मांडली आहे.
सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील यांनीही या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर पाणी वापराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कोका-कोला प्रकल्पाला विरोध करणार्यांना थेट प्रत्युत्तर दिले. जामनेर तालुक्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असून, प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे सांगत या प्रकल्पाबाबत अनावश्यक अफवा पसरवल्या जात असल्याचेही ना.महाजन यांनी म्हटले.

जामनेर तालुक्यात 11.5 टीएमसी क्षमतेचे धरण असून, भागपूर योजनेतूनही पाणी उपलब्ध होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच बोदवड सिंचन योजनेतून पाणी मिळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यामुळे औद्योगिक विकास आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न दोन्ही बाजूंनी हाताळता येऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.जामनेरमध्ये एमआयडीसीचा विस्तार झाल्यामुळे आगामी काळात हजारो रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे.
कोका-कोला प्रकल्प अत्याधुनिक आणि स्वयंचलित पद्धतीने चालविला जाणार असला, तरी विविध कामांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता राहणार असल्याचे ना. महाजन यांनी सांगितले. स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याबरोबरच परिसरातील व्यवसायांनाही त्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे. मोठा उद्योग उभारल्यास वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळण्याबरोबरच परिसरातील हॉटेल, किरकोळ व्यवसाय, सेवा क्षेत्र आणि इतर पूरक उद्योगांना चालना मिळू शकते. परिणामी जामनेर परिसरातील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









