Varangaon News: राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळ तालुक्याचे आ . संजय सावकारे यांनी वरणगाव नगरपरिषदेतील विविध विकासकामांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र, या निधीच्या वाटपात भाजपच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य देण्यात आल्याचा आरोप करीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. आपल्या प्रभागातील विकासकामांना निधी न मिळाल्याने अन्याय झाल्याचा आरोप करीत संबंधित नगरसेवकांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे वरणगाव नगरपरिषदेतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या घडामोडींकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
वरणगाव शहरातील विविध भागांमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण, पेव्हर ब्लॉक तसेच सांडपाण्याच्या गटारी आदी विकासकामांसाठी राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा भुसावळ तालुक्याचे आ. संजय सावकारे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून १ कोटी ६० लाखाचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये नगरोत्थान योजनेअंतर्गत ६० लाख रुपये, दलितेतर वस्ती विकासासाठी २० लाख रुपये, तर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ७० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, या निधी वाटपामध्ये भाजपा नगरसेवकांच्या बाजुने झुकते माप देण्यात आले असून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या एकाही विकासकामांचा समावेश करण्यात आलेला नाही . यामुळे राज्यात भाजप व शिवसेना शिंदे गटाची युती असतानाही स्थानिक पातळीवर विकास निधीच्या वाटपात दुजाभाव केला जात असल्याचा दावा या नगरसेवकांनी केला आहे.

दरम्यान, निधी वाटपाबाबत योग्य तो न्याय मिळावा आणि शिवसेना – राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सुचविलेल्या विकास कामांनाही निधी मंजूर करावा, या मागणीसाठी संबंधित नगरसेवक व कामगार नेते मिलींद मेढे यांनी नगर परिषदे समोर उपोषणाचा इशारा दिला आहे. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन यांच्या पत्नी नगरसेविका तृप्ता महाजन, विनोद झोपे, माला मेढे, शबानाबी खाटीक, राजेंद्र चौधरी ( स्विकृत नगरसेवक ), राष्ट्रवादीचे नाना चौधरी, इरफान सैय्यद यांचा समावेश आहे . तसेच लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनिल काळे यांनाही निधी वाटपात स्थान देण्यात आले नसुन त्यांना अनेक भुमिपुजन कार्यक्रमापासून वंचीत ठेवले जात असल्याने शहरातील भाजपच्या दोन्ही गटातील राजकारण चांगलेच चर्चेत येत आहे. त्यामुळे आगामी काळात हा निधी वाटपाचा मुद्दा अधिक चिघळण्याची शक्यता असून नगरपरिषदेत यावरून राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पालकमंत्री यांच्याकडे व्यथा मांडणार
या आरोपांबाबत वस्त्रोद्योग मंत्री आ . संजय सावकारे किंवा संबंधीत प्रशासनाची अधिकृत भुमिका अद्याप समोर आली नाही. यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांच्याकडे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत भुमिका मांडली जाईल असे सांगितले. तर दूसरीकडे भाजपा पदाधिकारी व नगरसेवकांकडून मंत्री संजय सावकारे यांनी नगर परिषदेला भरघोस निधी मंजूर करून दिल्याबद्दल सोशल मीडियावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.










