Nalkehda Car Accident : मध्य प्रदेशातील आगर-मालवा जिल्ह्यातील नलखेडा येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध माँ बगलामुखी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. येथे मुसळधार पावसामुळे दुथडी भरून वाहणाऱ्या ओढ्यात भाविकांची कार वाहून गेली. या दुर्घटनेत कारमधील आठ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये तीन मुले, दोन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नलखेडा परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे नद्या आणि ओढ्यांना पुराचे स्वरुप आले होते. रात्रीच्या अंधारात चालकाला ओढ्यातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न येता कारवरील नियंत्रण सुटून कार पुरात वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
अथक प्रयत्नानंतर मृतदेहा बाहेर काढले
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासन आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलीस, प्रशासनाचे अधिकारी आणि एसडीआरएफचे बचाव पथकाने क्रेन तसेच पाणबुड्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. तासनतास चाललेल्या प्रयत्नांनंतर ओढ्यातून कार बाहेर काढण्यात आली. अथक प्रयत्नानंतर कारमध्ये अडकलेले आठही मृतदेहही बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले.
दरम्यान, एकत्र प्रवास करणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, मृतांची अधिकृत ओळख अद्याप पटलेली नाही. कारचा नोंदणी क्रमांक, वाहनातील कागदपत्रे आणि अन्य उपलब्ध माहितीच्या आधारे मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत.









