Nashik News: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक नगरीत येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना आणि स्थानिक नागरिकांना सुरळीत, सुरक्षित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण पूर्ण क्षमतेने सज्ज झाले आहे. महावितरणकडून नव्याने उभारण्यात येत असलेल्या ३३/११ केव्ही नांदूर-मानूर व गोदापार्क उपकेंद्रांच्या कामांची पाहणी केली. ३३/११ केव्ही मेरी विद्युत उपकेंद्राच्या अद्यावतीकरणाच्या व क्षमतावाढीच्या कामांची तसेच महापारेषण कंपनीकडून नव्याने उभारण्यात येणाऱ्या मेरी १३२/३३ केव्ही (जीआयएस) या अतिउच्चदाब उपकेंद्राच्या कामांची महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व प्रगतीचा आढावा घेतला.
कुंभमेळ्यासाठी पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण आणि सूक्ष्म नियोजन करण्याच्या उद्देशाने महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी नाशिक परिमंडलाचा दौरा करून विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला तसेच प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली.
सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा
नाशिकरोड येथील येथील महावितरणच्या ‘ऊर्जा व्यवस्थापन आणि प्रशिक्षण संस्था सभागृहात झालेल्या आढावा बैठकीत राजेंद्र पवार यांनी अधिकाऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले. कुंभमेळा काळात सुरळीत व सुरक्षित वीज पुरवठा राखणे हेच प्रमुख उद्दिष्ट ठेवून नियोजित यंत्रणेची सर्व विकास कामे अत्यंत गुणवत्तापूर्ण आणि ठरवून दिलेल्या कालबद्ध मर्यादेत पूर्ण करून कामांना गती देण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
धोरणात्मक कामकाजाचाही आढावा
बैठकीदरम्यान कुंभमेळ्याच्या मुख्य तयारीसोबतच महावितरणच्या नाशिक परिमंडलातील इतर दैनंदिन व धोरणात्मक कामकाजाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. यामध्ये वीज बिलांची थकबाकी वसूली, वीजवाहिनी विलगीकरण व सक्षमीकरण, ग्राहक सेवा, नवीन वीजजोडण्या, वीजहानी कमी करण्याच्या उपाययोजना, वीजचोरीविरुद्ध कठोर उपाययोजना आणि विविध सौर ऊर्जा योजनांच्या अंमलबजावणीचा समावेश होता.

आढावा बैठकीला नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे (महावितरण), महेंद्र वाळके (महापारेषण), अधीक्षक अभियंते देवेंद्र सायनेकर, अनिल थोरात, रमेशकुमार पवार तसेच महापारेषणचे अधीक्षक अभियंता श्रीकृष्ण नवलाखे यांच्यासह कार्यकारी अभियंते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.









