Disha Salian Case: राज्यभर गाजलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा चर्चेत आहे. सीबीआयने बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी एफआयआर दाखल केला. २ सप्टेंबर रोजी, दिशाच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात दाखल झालेल्या एफआयआरमध्ये आता अनेक प्रमुख आणि मोठं मोठी नावे समोर आली आहेत.
उच्च न्यायालयाचा नेमका आदेश काय
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सीबीआयने सुशांत सिंग राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे, अभिनेते डिनो मोरिया आणि सूरज पांचोली यांचा समावेश आहे. या एफआयआरमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सचिन वाझे, परमबीर सिंग आणि रोहन रॉय यांच्यासह इतरांवरही आरोप ठेवण्यात आले आहेत. सीबीआय आता गुन्हेगारी कट, सामूहिक बलात्कार, खून आणि पुराव्यांशी छेडछाड यासह विविध दृष्टिकोनातून या प्रकरणाचा तपास करेल. यासह एफआयआरमध्ये नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीची या प्रकरणात भूमिका आणि व्याप्ती निश्चित करण्यासाठी तपास केला जाणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली तपास
यापूर्वी, न्यायालयाने सीबीआयला एफआयआर नोंदवून एका अनुभवी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली सखोल तपास करण्याचे निर्देश दिले होते. सीबीआयने दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचा जबाबही नोंदवला आहे. हा जबाब प्राथमिक तपासाचा एक महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. माध्यमातील वृत्तानुसार, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित त्यांचे दावे आणि उपलब्ध माहिती सीबीआय अधिकाऱ्यांसोबत शेअर केली आहे.
दिशाचा मृत्यू कधी झाला?
८ जून २०२० रोजी मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला. या घटनेच्या अवघ्या सहा दिवसांनंतर, १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंग देखील मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळला. दिशा प्रकरणाचा प्राथमिक तपास सुमारे तीन महिन्यांनंतर बंद करण्यात आला. त्यानंतर, सोशल मीडियावर विविध दावे समोर आल्यावर, २०२३ मध्ये हे प्रकरण पुन्हा उघडण्यात आले आणि एक एसआयटी (SIT) स्थापन करण्यात आली.
२०२५ मध्ये, दिशाच्या वडिलांनी तपासात त्रुटी असल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात न्यायालयीन चौकशीसाठी अर्ज दाखल केला. तेव्हापासून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

यापूर्वीचे तपास कधी करण्यात आले?
या प्रकरणाचा पहिला तपास जून २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत करण्यात आला. मालवणी पोलिसांनी केलेल्या या तपासात हे प्रकरण आत्महत्या असल्याचे म्हटले होते. या प्रकरणाचा दुसरा तपास मुंबई पोलिसांनी (एसआयटी) डिसेंबर २०२३ ते एप्रिल २०२६ या कालावधीत केला. यावेळीही हे प्रकरण आत्महत्या असल्याचे मानले गेले. आता सप्टेंबर २०२६ मध्ये या प्रकरणाचा तिसरा तपास सुरू करण्यात आला आहे. हा तपास सीबीआयमार्फत केला जात आहे. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी न्यायालयाने काय म्हटले?
दरम्यान अलीकडेच, न्यायालयाने या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सहा वर्षे एफआयआर न नोंदवणे आणि या प्रकरणाला केवळ एक अपघात म्हणून हाताळणे, यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात, असे न्यायालयाने म्हटले. यापूर्वी, मुंबई पोलिसांनी दोनदा तपास करून दिशाचा मृत्यू एक अपघात असल्याचे जाहीर केले होते.









