Uttar Pradesh: यमुना एक्सप्रेसवेवरून जाणाऱ्या एका स्लीपर बसला भीषण आग लागली. या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये ३५ प्रवासी होते. तर इतर अनेकांनी जीव वाचवण्यासाठी बसमधून उडी मारली. बुधवार आणि गुरुवार रात्रीच्या दरम्यान घडलेल्या या घटनेत अग्निशमन दलाच्या जवानांनी बसमध्ये प्रवेश करण्यासाठी स्लीपर बसचा मागील भाग कापला आणि एकेक करून मृतदेह बाहेर काढले. बचावकार्य सुमारे दोन तास चालले. बस पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या अपघात प्रकरणी पोलिसांनी दोन चालक आणि एका मदतनीसाला अटक केली आहे.
घटना अशी
मुख्य अग्निशमन अधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले की, (बीआर 32PA 8647) या नोंदणी क्रमांकाची बस नवी दिल्लीच्या काश्मिरी गेटहून महोबाकडे जात असताना जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्रुतगती मार्गावर ३३ किलोमीटरच्या मैलखुणेजवळ तिला आग लागल्याचे काही प्रत्येक्षदर्शीनी सांगितले.
२० हून अधिक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच, पोलीस अधिकारी, स्थानिक पोलीस, एक बचाव वाहन, जेवर टोल प्लाझा येथे तैनात असलेले अग्निशमन दलाचे एक वाहन आणि इतर चार अग्निशमन वाहने तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. त्यांनी सांगितले की, या बचावकार्यादरम्यान २० हून अधिक प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. धुराच्या लोटातून पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान बसमध्ये शिरले असता, त्यांना नऊ जण मृत आढळले; त्यांचा मृत्यू भाजल्यामुळे किंवा गुदमरल्यामुळे झाल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे..
कुमार यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, बसच्या एअर-कंडिशनिंग सिस्टीममधील ठिणगी किंवा स्फोटामुळे इंजिनच्या टॅंकमधील तेलाला आग लागली असावी, ज्यामुळे आग वेगाने पसरली. पोलिसांनी सांगितले की, ते मृत झालेल्या नऊ जणांची ओळख पटवण्याचा प्रयत्न ककेला जात आहे.
चालक- वाहक ताब्यात
एका निवेदनात पोलिसांनी म्हटले आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चालक आणि वाहकाला ताब्यात घेण्यात आले आहे.” पोलिसांनी सांगितले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली असून, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्यांनी अधिकाऱ्यांना जखमींवर योग्य उपचार सुनिश्चित करण्याचे आणि पीडितांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.
चालकाने केले गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष
रात्री सुमारे साडेआठ वाजता नोएडा ते आग्रा जाणाऱ्या यमुना द्रुतगती मार्गावरील ३३ व्या किलोमीटरजवळ बस पोहोचताच, केबिनमधून जळल्याचा वास येऊ लागला. काही प्रवाशांनी चालक आणि वाहकाला सावध केले, परंतु चालकाने गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केले. एका प्रवाशाने एफआयआरमध्ये सांगितले की, बस थांबल्यानंतर त्याने आणि इतर अनेक प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. बाहेर पडणे शक्य नसल्याने, त्याने आणि इतर अनेकांनी बसमधून उडी मारली. आग आणि धुरामुळे काही प्रवासी आत अडकले होते.
प्रवासी गंभीररित्या भाजले
आगीत अनेक प्रवासी गंभीररित्या भाजले आणि त्यांना उपचारासाठी जेवर येथील कैलास रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले.
राज कल्पना ट्रॅव्हल्सचे मालक मूळचे मध्य प्रदेशातील छतरपूरचे असल्याचे वृत्त आहे. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, बसच्या एसीमध्ये झालेल्या ठिणगी-स्फोटामुळे बसच्या इंजिन ऑइलला आग लागली आणि ती वेगाने पसरली.
मिळालेल्या माहितीनुसार, राज कल्पना ट्रॅव्हल्सच्या मालक मूळच्या मध्य प्रदेशातील छतरपूरच्या आहेत. प्राथमिक तपासात असे समोर आले आहे की, बसमधील एसीमध्ये झालेल्या ठिणगीमुळे किंवा स्फोटामुळे बसच्या इंजिन ऑइलला आग लागली आणि ती वेगाने पसरली.
प्रवाशांनी सांगितली आपबिती
एका महिला प्रवाशाने आपला अनुभव सांगताना म्हटले की, ती झोपलेली असताना कोणीतरी दरवाजा ठोठावला. जाग आल्यावर तिने पाहिले की बस आधीच खचाखच भरलेली होती. तिने आपले कोणतेही सामान उचलले नाही किंवा बूटही घातले नाहीत, तर फक्त आपला फोन घेतला आणि धावत बाहेर पडली. गर्दी इतकी प्रचंड होती की लोक एकमेकांना ढकलत होते. तिला ढकलण्यात आले आणि शेवटी कोणीतरी तिला बाहेर खेचले. त्यानंतर तिला काहीही आठवत नव्हते; तिच्या आजूबाजूला सर्वत्र धूर पसरला होता.
दोन चालक आणि एका मदतनिसास अटक
ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या स्लीपर बस अपघाताप्रकरणी पोलिसांनी दोन चालक आणि एका मदतनीसाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींची नावे पवन, विनोद आणि योगेश अशी आहेत. पवन आणि विनोद बस चालक आहेत, तर योगेश मदतनीस असल्याचे निष्पन्न झाले आहे .










