Central Railway: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे परिचालन अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी पायाभूत सुविधांची क्षमता वाढविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून इगतपुरी-भुसावळ मार्गावरील कसबे सुकेणे आणि खेरवाडी स्थानकांवर यार्ड पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी ३० सप्टेंबर रोजी नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही मेमू आणि एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्यांचे मार्गात बदल करण्यात आला आहे.
‘या’ मेमू गाड्या रद्द
नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी सहा मेमू गाड्यांचे परिचालन रद्द करण्यात आले आहे. यामध्ये गाडी क्रमांक ११११३ देवळाली-भुसावळ मेमू, गाडी क्रमांक ११११४ भुसावळ-देवळाली मेमू, गाडी क्रमांक ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू, गाडी क्रमाक १११२० भुसावळ-इगतपुरी मेमू, गाडी क्रमांक ६११३० बडनेरा-नाशिक मेमू आणि गाडी क्रमांक ६११२९ नाशिक-बडनेरा मेमूचा समावेश आहे.

या गाड्यांच्या मार्गात बदल
धनबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस आणि पुरी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या अंकाई, दौंड कॉर्ड लाईन, पुणे आणि लोणावळा मार्गे चालविण्यात येणार आहेत. याशिवाय ३० सप्टेंबर रोजी मुंबई-लखनौ एक्स्प्रेस लोणावळा, पुणे, दौंड कॉर्ड लाईन आणि अंकाई मार्गे लखनौकडे रवाना होणार आहे.
जनशताब्दीचा प्रवास मनमाडपर्यंतच
तर हिंगोली डेक्कनहून सुटणारी १२०७२ हिंगोली डेक्कन-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड येथेच थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे मनमाड ते मुंबईदरम्यानचा तिचा प्रवास रद्द राहील. तसेच १२०७१ मुंबई-हिंगोली डेक्कन जनशताब्दी एक्स्प्रेस मुंबईऐवजी मनमाडहून नियोजित वेळेनुसार सुटणार आहे.
७ गाड्या मार्गात नियंत्रित
३० सप्टेंबर रोजी सात गाड्यांना त्यांच्या मार्गावर ठरावीक कालावधीसाठी नियंत्रित करण्यात येणार आहे. यामध्ये पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, प्रयागराज-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, भागलपूर-एलटीटी एक्स्प्रेस, एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस, मुंबई-आसनसोल एक्स्प्रेस आणि एलटीटी-जयनगर एक्स्प्रेसचा समावेश आहे.
काही गाड्या भुसावळ-निफाडदरम्यान तर काही इगतपुरी-नाशिकदरम्यान नियंत्रित केल्या जाणार आहेत. या नियंत्रणाचा कालावधी साधारण एक तासापासून तीन तासांपर्यंत राहणार आहे.









