Dhule News: गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भाविक व नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी धुळे महानगरपालिकेच्या वतीने विसर्जन स्थळांची पाहणी करण्यात आली. महापौर मायादेवी परदेशी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी पदाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत हत्ती डोह येथील मुख्य विसर्जन स्थळासह विविध ठिकाणांची पाहणी करून आवश्यक त्या सूचना दिल्या.
महापौर-आयुक्तांचा पाहणी दौरा
हत्ती डोह येथील मुख्य विसर्जन स्थळाची पाहणी करताना गणेश विसर्जनासाठी उपलब्ध पाण्याचा प्रवाह, संभाव्य पाण्याची व्यवस्था, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, भाविकांसाठी पूजनाची सुविधा, टेबलची व्यवस्था, निर्माल्य संकलन तसेच आपत्कालीन पथकाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व आदेश देण्यात आले.
१२ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था
गणेश विसर्जनासाठी नदीपात्रालगत १२ ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणी विविध कामांसाठी सुमारे १८५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विसर्जनस्थळी गणेशमूर्ती संकलन, निर्माल्य संकलन व विद्युत व्यवस्था करण्यात आली आहे. संकलित करण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्याबाबतही संबंधित कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.
रस्ते दुरुस्तीच्या सूचना
विसर्जनाच्या दिवशी नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता मुख्य रस्त्यांची पाहणी करून आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, वाहतूक व आपत्कालीन सेवांच्या दृष्टीनेही आवश्यक नियोजन करण्यावर भर देण्यात आला.

यावेळी उपमहापौर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई सोनार, महिला व बालकल्याण सभापती उज्ज्वला ठाकरे, अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, महादेव परदेशी, प्रफुल्ल पाटील, उपायुक्त मनोज वाघ, शहर अभियंता चंद्रकांत उगले, विद्युत अभियंता पराग ठाकरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक राजेश वसावे, सहाय्यक आयुक्त सागर जकातदार, राजेंद्र माईनकर, किशोर वाघ, किशोर शिंदे यांच्यासह अग्निशमन दलाचे पथक व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.









